सोलापूर : यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास अवघा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना जिल्ह्यात ऊस वाहतुकीची लगबग सुरू झाली आहे. साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टरधारकांशी करार करण्यास सुरुवात केली असून, या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून ट्रॅक्टर-ट्रॉलींची फिटनेस तपासणी मोहीम लवकरच राबविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर बैठक झाल्यानंतर नियमित तपासणीसोबतच विशेष मोहीमही हाती घेतली जाणार आहे.
यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली, अंगद-जुगाड वाहने तसेच ट्रकच्या सुरक्षिततेबाबत साखर आयुक्तालयाने साखर कारखाने आणि प्रादेशिक परिवहन विभागाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. या सूचनांनुसार ऊस वाहतुकीसाठी नोंदणीकृत ट्रॅक्टर-ट्रॉलीच वापरली जात आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. तसेच चालकाकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना, वाहनाचा विमा आणि इतर आवश्यक कागदपत्रे आहेत की नाही, याचीही खातरजमा केली जाणार आहे.
ट्रॉलीच्या फिटनेसकडे विशेष लक्ष
वाहतुकीस योग्य स्थितीत नसलेल्या ट्रॉलीमुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदाच्या हंगामात ट्रॅक्टरसोबतच ट्रॉलीच्या फिटनेसची तपासणीही महत्त्वाची ठरणार आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर बोर्ड आणि रिफ्लेक्टिव्ह टेप बसविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी तसेच हंगामादरम्यान वाहन कायद्याचे पालन होत आहे की नाही, यावर आरटीओ विभागाकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
ऊस गाळप हंगामासाठी वाहनांच्या फिटनेस तपासणीला लवकरच सुरुवात करण्यात येईल. जिल्हास्तरावर बैठक झाल्यानंतर ट्रॅक्टर-ट्रॉलींची तपासणी केली जाईल. तसेच वाहनांना रिफ्लेक्टर बोर्ड आणि रिफ्लेक्टिव्ह टेप बसविण्यात येतील, अशी माहिती सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली.
तपासणीत कोणत्या बाबी पाहणार?
- ट्रॅक्टर-ट्रॉलीची वाहतुकीसाठी योग्य स्थिती
- रिफ्लेक्टर बोर्ड आणि रिफ्लेक्टिव्ह टेप
- चालकाचा वैध वाहन परवाना
- वाहनाचा विमा
- वाहनाची आवश्यक कागदपत्रे
- वाहन कायद्याचे पालन


















