अहिल्यानगर : ऊस दर निश्चितीसाठी हंगामपूर्व बैठक घेण्याची जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

अहिल्यानगर : आगामी ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर मागील हंगामातील त्रुटी, ऊसदरातील अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी ऊस गाळप हंगामपूर्व बैठक तातडीने घेण्यात यावी, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधी अभिजित पोटे यांनी केली. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय वाघ उपस्थित होते. गेल्यावर्षी, २०२५-२६च्या ऊस गाळप हंगामात काही कारखान्यांनी साखर उतारा कमी दाखवून ऊसदर कमी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. साखर उताऱ्यातील तांत्रिक त्रुटी आणि त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान, या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

यावेळी अभिजित पोटे यांनी यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने ऊस पिकाची अपेक्षित वाढ झालेली नाही. ऑक्टोबरमध्ये गाळप हंगाम सुरू केल्यास साखर उतारा कमी होऊन शेतकऱ्यांना कमी ऊसदर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाळप हंगाम नोव्हेंबरअखेर किंवा डिसेंबरमध्ये सुरू करण्यात यावा, अशी मागणी केली. गेल्या हंगामातील प्रलंबित प्रश्नांविषयी ते म्हणाले की, २०२३च्या ऊस गाळप हंगामात श्रीगोंदा येथील कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याने जास्तीचा ऊसदर सांगून ऊस तोडून नेला. त्यानंतर जप्तीची कारवाई झाल्यावर केवळ एफआरपीप्रमाणे पैसे देण्यात आल्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ७११ रुपयांचा तोटा सहन करावा लागला. याप्रकरणी संबंधित कारखान्याचे चेअरमन व कार्यकारी संचालक यांना हंगाम पूर्व बैठकीस बोलावून योग्य ती चर्चा करून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here