पुणे : धोकादायक ऊस वाहतूक केल्यास कारवाईचा पोलिसांचा वाहनधारकांना इशारा

पुणे : सध्या ऊसतोड हंगाम सुरू झाल्याने पोलिस चौकीच्या हद्दीत ऊस वाहतुकीची वर्दळ वाढली आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरला तीन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करण्याचे प्रकार, तसेच पिकअप वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मजूर बसवून वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. नियमबाह्य भार आणि धोकादायक मजूर वाहतुकीमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने पोलिसांनी आता थेट कारवाईची भूमिका घेतली आहे. जिल्ह्यात ट्रॅक्टरला बेकायदेशीरपणे तीन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करणे अथवा पिकअप वाहनातून नियमबाह्य पद्धतीने मजुरांची वाहतूक करणे संबंधितांना चांगलेच महागात पडणार आहे.

ऊस गुऱ्हाळ चालक आणि वाहतूकदारांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, ट्रॅक्टरला विनापरवाना अथवा बेकायदेशीररीत्या तीन ट्रॉली जोडणे आणि पिकअपमधून नियमबाह्य पद्धतीने मजुरांची वाहतूक करणे टाळावे अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, ऊस वाहतुकीची बहुतांश वर्दळ रात्रीच्या वेळी होत असल्याने नियमबाह्य वाहनांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अतिरिक्त ट्रॉली, क्षमतेपेक्षा अधिक भार आणि धोकादायक पद्धतीने मजूर वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे. शिरूर पोलिस ठाणे व पुणे ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येईल. ऊस वाहतुकीच्या नावाखाली वाहतूक नियमांना हरताळ फासणाऱ्या चालक आणि वाहन मालकांवर नजर ठेवली जाईल. अशा वाहनांवर कारवाई करताना चालकासह मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी दिला.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here