छत्रपती संभाजीनगर : अपुऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील २०२६-२७ च्या गाळप हंगामात साखर उत्पादनात सुमारे २० टक्क्यांची घट होऊन ते जवळपास ८० लाख टनांवर येण्याची शक्यता आहे, अशी माहिती वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे (WISMA) अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी दिली. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे. महाराष्ट्र हा देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्यांपैकी एक आहे. राज्यात २०२५-२६ च्या गाळप हंगामात सुमारे ९९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
ठोंबरे यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, उसाचे लागवड क्षेत्र चांगले आहे; मात्र यंदा उसाच्या एकरी उत्पादनात ३० ते ४० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. गाळपाला जितका उशीर होईल, तितके उत्पादन आणखी घटत जाईल. त्यामुळे उसाचे गाळप लवकर सुरू करणे आवश्यक आहे. यंदा महाराष्ट्रात पावसाची मोठी तूट निर्माण झाली असून, त्याचा परिणाम उसासह विविध पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जलाशयांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे लागत असल्याने जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात साखर कारखान्यांसमोर पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याचीही शक्यता आहे.
ठोंबरे यांच्या मते, मराठवाडा, विदर्भ, सोलापूर आणि अहिल्यानगर या भागांमध्ये परिस्थिती विशेषतः गंभीर झाली आहे. गेल्या ४५ दिवसांपासून पाऊस नसल्याने या भागांतील शेतांमध्ये उभा ऊस सुकू लागला आहे. ऊस लवकरात लवकर गाळपासाठी पाठवला तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात उत्पन्न मिळेल. अन्यथा शेतातील उभा ऊस सुकून जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र सरकारने यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे ठोंबरे यांनी स्वागत केले असून, लवकर गाळप सुरू केल्याने शेतकरी आणि साखर कारखाने या दोघांनाही फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.
सध्या साखरेचे दर अनुकूल असून, दिवाळीपर्यंत ते स्थिर राहण्याची शक्यता असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. साखर उतारा कमी झाल्यामुळे होणारे नुकसान सध्याच्या साखरेच्या दरातून काही प्रमाणात भरून काढता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उसाचे घटते उत्पादन, पाण्याची उपलब्धता आणि गाळपाला उशीर झाल्यास शेतातील उभ्या उसाची स्थिती आणखी खराब होण्याचा धोका लक्षात घेता, WISMA ने साखर कारखान्यांनी लवकर गाळप सुरू करण्याची गरज व्यक्त केली. लवकर गाळपामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाचे संभाव्य नुकसान कमी होण्यास मदत होईल, असे संघटनेने म्हटले आहे.


















