बीड : ऊसतोडणी मजुरीत १०० टक्के वाढ करा; मागणी मान्य न झाल्यास ऊसतोड कामगार संघटनांचा आंदोलनाचा इशारा

बीड : राज्यातील साखर कारखान्यांचा आगामी गळीत हंगाम सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच ऊसतोड कामगार आणि मुकादम संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ऊसतोडणी व ऊस वाहतूक मजुरीत १०० टक्के वाढ करण्यासह विविध मागण्यांसाठी संघटनांनी अंतिम इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास साखर कारखान्यांचे चाक फिरू देणार नाही, असा इशारा लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

बीडसह शेजारील जिल्ह्यांमधून दरवर्षी लाखो ऊसतोड कामगार पश्चिम महाराष्ट्रासह परराज्यांत ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. या कामगारांना त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी आगामी दरकरारात ऊसतोडणी व वाहतूक मजुरीत १०० टक्के वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.याशिवाय बैलगाडी, गाडी सेंटर, मिनी ट्रॅक्टर, ट्रक तसेच अन्य वाहतूक दरांमध्येही १०० टक्के वाढ करावी, मुकादमांच्या कमिशनमध्ये ५० टक्के वाढ करावी, प्रत्येक ऊसतोड कामगार आणि मुकादमाचा विमा साखर कारखान्याने बंधनकारक करावा, तसेच अपघाती मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशा विविध मागण्या संघटनेने केल्या आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

तीन वर्षांचा दरकरार संपुष्टात

ऊसतोड कामगार संघटना आणि साखर संघ यांच्यात संयुक्त लवादाची व्यवस्था आहे. याअंतर्गत खासदार शरद पवार आणि ऊसतोड कामगार नेत्या पंकजा मुंडे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर २०२४ मध्ये दरकरार निश्चित करण्यात आला होता. हा तीन वर्षांचा करार आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे नव्या दरकरारासाठी ऊसतोड कामगार संघटना आक्रमक झाल्या असून, गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आव्हान साखर उद्योगासमोर आहे.

साखर संघाला १९ मागण्यांचे निवेदन

लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड मजूर, वाहतूकदार व मुकादम संघटनेच्या वतीने साखर संघाला १९ मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. या मागण्यांवर सकारात्मक विचार करावा; अन्यथा साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कृष्णा तिडके आणि सचिव गोरक्ष रसाळ यांनी दिली. या मागण्यांवर सकारात्मक तोडगा न निघाल्यास ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसतोड कामगारांच्या मागण्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here