कोल्हापूर : साखरेच्या वाढलेल्या दराचा आर्थिक लाभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा, तसेच मागील गळीत हंगामातील उसासाठी प्रतिटन ३०० रुपयांचा वाढीव हप्ता तातडीने अदा करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, २०२५-२६ च्या गळीत हंगामात कारखान्यांनी गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत दर दिला होता. त्यावेळी साखरेचे दर प्रतिक्विंटल सुमारे ३ हजार ५०० ते ३ हजार ६०० रुपये होते. मात्र, सध्या साखरेच्या दरात मोठी वाढ झाली असून, साखर सुमारे ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जात आहे. साखरेच्या वाढलेल्या दरामुळे साखर कारखान्यांना अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळत आहे. या वाढीव उत्पन्नातील योग्य हिस्सा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणे आवश्यक असल्याचे शिवसेना ठाकरे गटाने म्हटले आहे.
वाढत्या उत्पादन खर्चाचा शेतकऱ्यांना फटका
खते, बियाणे तसेच अन्य कृषी निविष्ठांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यातच पावसाचे अनिश्चित स्वरूप कायम असल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट अधिक गडद होण्याची शक्यता असून, वाढीव हप्ता मिळाल्यास त्यांना मोठा आर्थिक आधार मिळेल, असा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
प्रतिटन ३०० रुपयांचा वाढीव हप्ता न दिल्यास ऊस वाहतूक रोखण्याचा इशारा
सणासुदीचा काळ लक्षात घेऊन मागील हंगामातील उसासाठी प्रतिटन ३०० रुपयांचा वाढीव हप्ता तातडीने देण्याचे आदेश साखर कारखान्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.अन्यथा १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या साखर कारखान्यांची ऊस वाहतूक रोखून गाळप बंद पाडण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाने दिला आहे.निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, राजू रेडेकर, अजित खोत, युवराज पोवार, गणेश बागडी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


















