पुणे : उसाला ७५०० रुपये हमीभाव मिळवण्याचा रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात ठराव

पुणे : रयत क्रांती शेतकरी संघटनेच्यावतीने खेड तालुक्यातील काळुस येथे झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात उसाला प्रतिटन ७ हजार ५०० रुपये हमीभाव मिळेपर्यंत कारखान्यांना ऊस देणार नाही, असा निर्धार करण्यात आला. मेळाव्यात ऊस उत्पादकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. जोपर्यंत अपेक्षित दर मिळणार नाही, तोपर्यंत उसाला कोयता लावू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. साखर आणि इथेनॉलचे दर वाढत असताना त्याचा योग्य मोबदला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मिळणे आवश्यक आहे. शासनाने हा दर जाहीर करेपर्यंत ऊस कारखान्यांना देऊ नये. त्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याची तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी, असे आवाहन ज्येष्ठ शेतकरी नेते शिवाजीराव नांदखिले यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या मोहिमेला सर्वांनी पाठिंबा देऊन शासनस्तरावर पाठपुराव्यास सहकार्य करावे. उसाला प्रतिटन ७ हजार ५०० रुपये भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जिल्हा परिषद सदस्य गणेश अरगडे यांनी रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या ऊस उत्पादकांच्या हितासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे कौतुक केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष पवळे, संत तुकाराम कारखान्याच्या संचालक ज्योती अरगडे, सामाजिक कार्यकर्ते व लेखक अशोकराव टाव्हरे, कुणबी संघटनेचे अध्यक्ष अप्पासाहेब कड, गजानन गाडेकर, विश्वनाथ पोटवडे, सचिन अरगडे आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव पवळे यांनी प्रास्ताविक केले. माजी चेअरमन सचिन अरगडे यांनी आभार मानले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here