अहिल्यानगर : येथील श्री. गणेश सहकारी साखर कारखान्याची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी प्रमुख मार्गदर्शन केले. गणेश कारखाना हा सभासदांचा आहे. तो जपण्याची जबाबदारी सभासदांचीच आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. गणेश कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस गणेशलाच द्यावा, असे आवाहन थोरात यांनी सभासदांना केले. आमदार विवेक कोल्हे, गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हाईस चेअरमन विजय दंडवते, माजी संचालक गंगाधर चौधरी, माजी व्हाईस चेअरमन शिवाजीराव लहारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुधीर म्हस्के, शितलताई लहारे, वकील पंकज लोंढे, शरद थोरात, कार्यकारी संचालक जी. बी. संगमनेरचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी नितीन भोसले आदी उपस्थित होते.
माजी मंत्री थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचा नामोल्लेख न करता गणेश सहकारी साखर कारखान्याचे सभासद विधानसभा निवडणुकीला विखे पाटील यांना मतदान करतात. त्यामुळे त्यांनी आता गणेश कारखान्याला मदत करावी, असे आवाहन केले. यावेळी आमदार विवेक कोल्हे म्हणाले, कारखाना जेव्हा ताब्यात आला तेव्हा ऐंशी कोटींहून अधिक कर्ज होते. त्यातून मार्ग काढून शासनाकडून एनसीडीसी अंतर्गत व जिल्हा बँकेतून बाळासाहेब थोरात आणि माझ्या प्रयत्नाने कर्ज उपलब्ध करण्यासाठी काम केले. जिल्हा सहकारी बँकेच्या ४० कोटी रुपयांच्या गणेश कारखान्याच्या कर्जाला विखे पाटील कारखान्याने दिलेला स्थगितीचा निकाल गणेश कारखान्याच्या बाजूने लागल्याचे सांगितले. या सर्वसाधारण सभेवेळी संचालक, सभासद, शेतकरी संघटना, निळवंडे कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


















