बेळगाव (कर्नाटक) : कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा आगामी २०२६-२७ चा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून, यंदा ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पराप्पा सवदी यांनी दिली. कारखाना परिसरात सोमवारी झालेल्या २०२६-२७ या वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना सवदी यांनी ही माहिती दिली.
सवदी म्हणाले की, मागील गळीत हंगामात ६ ते ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, अपेक्षित प्रमाणात ऊस उपलब्ध न झाल्याने सुमारे ५ लाख टन उसाचेच गाळप करता आले. परिणामी, कारखान्याला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले.यंदा शेतकऱ्यांनी ११.५ टक्के रिकव्हरी देणारा गुणवत्तापूर्ण ऊस कारखान्याला पुरविल्यास साखर उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल. तसेच कारखान्याची आर्थिक स्थितीही अधिक मजबूत होईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे हित ही कारखान्याची सर्वोच्च प्राथमिकता असून, शेतकरी आणि कारखाना यांनी परस्पर सहकार्याने पुढे जाणे आवश्यक आहे, असे सवदी यांनी स्पष्ट केले. ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना बिलाच्या रकमेसाठी विलंब होऊ नये, यासाठी ऊस पुरवठ्यानंतर १५ दिवसांच्या आत बिल अदा करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सभेला उपाध्यक्ष शंकर वाघमोडे, संचालक गुरुबसू तेवरमणी, शांतिनाथ पाटील, सिद्राय नाईक, प्रल्हाद पाटील, दया कुलकर्णी, सुनंदा नाईक, मल्लिकार्जुन गोटखिंडी, रमेश पट्टण, हनुमंत जगदेव, विश्वनाथ पाटील, व्यवस्थापकीय संचालक एस. के. पाटील, तसेच चिदानंद सवदी, मल्लेश सवदी, शिवकुमार सवदी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते.


















