सोलापूर : सोलापूर विभागातील ३५ कारखान्यांनी साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या ‘ऑनलाइन क्रशिंग लायसन्स’ प्रणालीवर गाळप परवान्यासाठी ऑनलाइन प्रस्ताव भरण्यास सुरुवात केली आहे. प्राप्त प्रस्तावांची छाननी करून परिपूर्ण प्रस्तावांना साखर आयुक्तांची मान्यता घेण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने गाळप परवाने वितरित केले जाणार आहेत. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या घटलेल्या पातळीमुळे उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष गाळपासाठी उपलब्ध होणारा ऊस तुलनेने कमी कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जादा गाळप क्षमतेचे कारखाने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस मिळविण्यासाठी उसाची पळवापळवी करतील अशी शक्यता आहे.
राज्यात यंदा १५.४८ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा असून, त्यातून सुमारे १२५० लाख टन ऊस उपलब्ध होईल, असा प्राथमिक अंदाज साखर आयुक्तालय आणि सामंजस्य करार झालेल्या मिटकॉन संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, कारखानदारांनी या आकडेवारीवर आक्षेप घेतल्याने प्रत्यक्ष शेतशिवारातील परिस्थिती तपासण्यासाठी फेरआढावा घेण्यात येत आहे. त्याचा अहवाल लवकरच अपेक्षित आहे. जिल्ह्यात पावसाअभावी उसाची वाढ खुंटली असून, विहिरी आणि बोअरमधील पाणीपातळीतही घट झाली आहे. त्याचा परिणाम यंदाच्या गाळप हंगामावर होण्याची शक्यता आहे. त्यातच सोलापूरसह राज्यात खोडव्याचे प्रमाण सुमारे ६० टक्के असल्याने साखर उताऱ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मोठ्या क्षमतेच्या कारखान्यांना पुरेसा ऊस मिळविण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेरही धाव घ्यावी लागू शकते.


















