सांगली : डफळापूर (ता. जत) येथील श्रीपती शुगरच्या चौथ्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व मोळीपूजन आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते झाले. ‘हा कारखाना परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना आहे. शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. दुष्काळग्रस्त भागात रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांना साथ, दळणवळण व आधुनिकीकरण हे धोरण डोळ्यासमोर ठेवून कारखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. दिवंगत पतंगराव कदम यांनी जत तालुका विकासाच्या बाबतीत मागे राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याची पूर्तता आम्ही करत आहोत, असे ते म्हणाले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र लाड यांनी गळीत हंगामाच्या तयारीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘गतवर्षी प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या विश्वासामुळे चांगले गाळप झाले. यंदा गाळप क्षमता वाढवून सहा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस कारखान्याकडे पाठवावा.’ सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी ‘ऊस उत्पादन वाढविण्यासाठी ऊस विकास विभाग सुरू केला असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील’ अशी घोषणा केली. माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी ‘तालुक्यासाठी हा कारखाना वरदान ठरला असून, त्यामुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे असे सांगितले. यावेळी महादेवराव पाटील, महेश जोशी, सुभाष गायकवाड, बाबासाहेब माळी, किशोर पाटील यांच्यासह मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व वाहतूकदार उपस्थित होते. महेश जोशी यांनी आभार मानले.


















