महाराष्ट्र : साखर कारखाने १५ ऑक्टोबरला सुरू करण्यास शेतकरी संघटनांचा विरोध; ८ ऑक्टोबरला साखर आयुक्तालयावर ‘हल्लाबोल मोर्चा’चा इशारा

पुणे / कोल्हापूर : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याच्या निर्णयाला शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. कारखाने १५ नोव्हेंबरनंतरच सुरू करावेत, अशी मागणी संघटनांनी केली आहे. १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू केल्यास कमी उताऱ्याचा ऊस गाळला जाईल आणि त्याचा आर्थिक फटका ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने तसेच सरकारला बसू शकतो, असा दावा संघटनांनी केला. या मागण्यांसह विविध प्रश्नांवर सात शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी गुरुवारी पुणे येथे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी सविस्तर चर्चा झाली. कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय कायम राहिल्यास ८ ऑक्टोबर रोजी साखर आयुक्तालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही संघटनांनी दिला.शिवसेना शेतकरी सेना, जय शिवराय किसान संघटना, शेतकरी-शेतमजूर संघटना, किसान मोर्चा, शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि आम आदमी पार्टीच्या प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग घेतला.

ChiniMandi WhatsApp Channel

कमी उताऱ्याच्या उसामुळे शेतकरी, कारखान्यांचे नुकसान

सध्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने उसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या कालावधीत उसाची साखर उतारा क्षमता तुलनेने जास्त असते. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू केल्यास सुरुवातीच्या काळात सुमारे ९ टक्के उतारा असलेला ऊस गाळावा लागू शकतो, असा दावा शेतकरी संघटनांनी केला.कमी उताऱ्याचा ऊस गाळल्याने साखर उत्पादनाचा खर्च वाढेल. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरावर होण्याची शक्यता असून सरकारलाही अपेक्षित प्रमाणात साखर उपलब्ध होणार नाही. त्यामुळे गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू करावा, अशी मागणी संघटनांनी केली.

साखरेची एमएसपी ५५ रुपये किलो करण्याची मागणी

साखरेची किमान विक्री किंमत (MSP) प्रतिकिलो ५५ रुपये करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. याबाबत शिवसेना शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी सांगितले की, सरकारने कच्ची साखर ५२ रुपये किलो दराने आयात केल्याचे समजते. त्यावर वाहतूक खर्च सुमारे ७ रुपये आणि प्रक्रिया खर्च ८ रुपये गृहीत धरल्यास देशांतर्गत बाजारात तिची किंमत सुमारे ६५ रुपये किलोपर्यंत जाऊ शकते. त्यावर नफा धरल्यास ग्राहकांना ही साखर सुमारे ७० रुपये किलो दराने खरेदी करावी लागू शकते. त्यामुळे देशात उत्पादित होणाऱ्या पक्क्या साखरेची एमएसपी ५५ रुपये किलो करावी, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीबाबत सरकारसोबत सकारात्मक चर्चा करून निर्णयाची माहिती देण्यात येईल, असे साखर आयुक्त संजय कोलते यांनी सांगितले.

एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई

मागील गळीत हंगामातील एफआरपी वेळेत न देणाऱ्या तसेच त्यावरील व्याजाची रक्कम न देणाऱ्या साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्र (RRC) अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती साखर आयुक्तांनी दिली. तसेच वेळेत आरएसएफ सादर न करणाऱ्या कारखान्यांवरही कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.एफआरपीचा अहवाल व्याजासह वेळेत सादर न करणाऱ्या कारखान्यांच्या संचालक मंडळावर आणि जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी. संबंधित रक्कम त्यांच्या वैयक्तिक संपत्तीतून वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी सावकार मादनाईक यांनी केली. याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन साखर आयुक्तांनी दिले.

साखर कारखान्याच्या परिसरात सरकारी वजन काटे उभारण्याची मागणी

ऊस वजनातील पारदर्शकतेसाठी प्रत्येक जिल्ह्यात सरकारच्या खर्चाने स्वतंत्र वजन काटे उभारावेत, अशी मागणी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केली. प्रत्येक साखर कारखान्याच्या परिसरात किमान दहा सरकारी वजन काटे उभारून तेथे केलेले वजन ग्राह्य धरावे आणि कारखान्यांचे वजन काटे बंद करावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दुधातील फॅटच्या प्रमाणाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या उसाच्या साखर उताऱ्यानुसार दर निश्चित करावा, अशी मागणीही करण्यात आली. या दोन्ही मागण्यांबाबत शासनाला कळवून आवश्यक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे साखर आयुक्त संजय कोलते यांनी सांगितले.

उपपदार्थांच्या उत्पन्नातील हिस्सा शेतकऱ्यांना देण्याची मागणी

मागील गळीत हंगामात साखरेसोबत इतर उपपदार्थांनाही चांगला दर मिळाला. त्यामुळे या उत्पन्नातील नफा विचारात घेऊन शेतकऱ्यांना ५२५ रुपये दुसरा हप्ता म्हणून देण्यात यावा, अशी मागणी जनार्दन पाटील यांनी केली. सर्व साखर कारखान्यांकडून आरएसएफची रक्कम घेऊन त्यानुसार देय रक्कम देण्याबाबत साखर आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली.

ऊसतोडी क्रमपाळीनुसार करण्याची मागणी

सर्व साखर कारखान्यांनी क्रमपाळीनुसार ऊस तोडी द्याव्यात, अशी मागणी वैभव कांबळे यांनी केली. त्यामुळे ‘खुशाली’च्या नावाखाली ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करण्याचे प्रकार कमी होतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी भगवान काटे यांनी केली. बैठकीस साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, संचालक (अर्थ) यशवंत गिरी, संचालक (प्रशासन) केदारी जाधव, सहसंचालक (प्रशासन) प्रकाश आष्टेकर, सहसंचालक (विकास) महेश झेंडे यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना शिवसेना शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील म्हणाले कि, पावसाच्या अभावामुळे ऊस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. साधारणपणे जानेवारी ते मार्च या कालावधीत उसाची रिकवरी चांगली असते. जर गाळप हंगाम लवकर गाळप सुरु केल्यास त्याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसू शकतो. कमी रिकवरीमुळे कारखान्यांनाही नुकसान होण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादक शेतकरी आणि देशातील साखर उद्योगाच्या हितासाठी घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या आधारावर साखरेसाठी द्विस्तरीय किंमत लागू करण्याची गरज आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या साखरेचा दर प्रति किलो 20 रुपये आणि व्यावसायिक वापराच्या साखरेचा दर प्रति किलो 80 रुपये करण्याची गरज असल्याचेही त्यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here