बेळगाव : ऊस दराच्या बैठकीला अधिकारी, लोकप्रतिनिधींची उपस्थिती हवी; शेतकरी संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बेळगाव : अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत उत्पादित उसाला योग्य दर मिळणे गरजेचे असल्याचे सांगत कर्नाटक राज्य रयत संघटना आणि हरित सेनेने ऊस दर निश्चितीच्या बैठकीला अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच संबंधित मंत्र्यांनी उपस्थित राहावे, अशी मागणी केली आहे. ऊस दर निश्चित करण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी हुक्केरी तालुक्यातील गुर्लापूर क्रॉस येथे शेतकरी संघटनांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्ह्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बैठकीत ऊस दराबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

या संदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि संबंधित मंत्र्यांनी बैठकीला उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच त्यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.दरम्यान, जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते व अध्यक्ष गणेश ईळगेरी यांनी केली. पावसाअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे योग्य पंचनामे करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिएकर एक लाख रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here