सांगली : नागेवाडी (ता. खानापूर) येथील भारती शुगर्सचा चौथा गळीत हंगाम व द्वितीय बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी महेंद्र लाड, ऋषिकेश लाड, रोहन लाड, आर. डी. पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महेंद्र लाड म्हणाले, भारती शुगर्स आपल्या हक्काचा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भावना लक्षात घेऊनच यापुढची वाटचाल राहणार आहे. दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे, मोहनराव कदम व आमदार विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे हित जपले जाईल.
ते म्हणाले, यापूर्वी कारखान्याची गाळप क्षमता मर्यादित असल्याने परिसरातील संपूर्ण उसाचे गाळप करू शकत नव्हतो. कार्यक्षेत्रातील उसाची उपलब्धता, शेतकऱ्यांची अडचण व गरज ओळखून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला.शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला गळितास पाठवावा. येत्या हंगामासाठी वाढीव गाळप क्षमता, सहवीज निर्मिती व भविष्यात डिस्टिलरी व इतर उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारणार असून, त्याचा जास्तीत जास्त फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाच देण्याचा प्रयत्न राहणार आहे. यावेळी दिलीप लाड, उमेश लाड, पोपट थोरबोले, शशिकांत पवार, दिनकर पवार, सयाजी धनवडे, सतीश निकम, प्रवीण रावताळे, किरण साळुंखे, विक्रम लाड, राकेश पाटील, संदीप लाड उपस्थित होते.


















