पुणे : विघ्नहर कारखाना १० लाखांपेक्षा जास्त टन ऊस गाळप करणार, बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात

पुणे : पावसाची अनियमितता आणि प्रतिकूल हवामानामुळे उसाची वाढ कमी झाली आहे. कमी पावसामुळे हुमणी किडीचा प्रादुर्भाव वाढला असून, ऊस उत्पादकांच्या एकरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. ही बाब विघ्नहर सहकारी साखर कारखाना आणि शेतकऱ्यांचीही चिंता वाढवणारी आहे. कारखाना १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करणार असून, यंदा दहा लाख टनांपेक्षा जास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी दिली. कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाचे बॉयलर अग्निप्रदीपन शनिवारी संचालक बाळासाहेब पांडुरंग घुले व त्यांच्या पत्नी वंदना घुले यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. उसाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन आणि कारखान्यामार्फत देण्यात येणारी खते तसेच इतर सुविधांचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.

ऊसतोडणी आणि वाहतूक यंत्रणेचे करार पूर्ण झाले असून, को-जनरेशन प्रकल्पही पूर्ण क्षमतेने चालणार आहे. मात्र, केंद्राच्या इथेनॉल धोरणाचा विचार करून डिस्टिलरी प्रकल्पाबाबत योग्य निर्णय घ्यावा लागेल, असेही शेरकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, कारखान्यातील सर्व मशिनरी दुरुस्ती व देखभालीची कामे पूर्ण झाली आहेत. ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये टायर बैलगाडी, ट्रॅक्टर टायर गाडी, गाडीसेंटर टोळी, डोके सेंटर टोळी व ऊस तोडणी यंत्र या सर्वांचे योग्य असे नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून, दैनंदिन गाळप क्षमता पाच हजार टनांवरून साडेसात हजार टन झाली आहे. यंदाच्या हंगामात दररोज आठ ते साडेआठ हजार टन ऊस गाळप करण्याचे नियोजन आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here