सोलापूर : लोकनेते बाबूराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर विभागात बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम झाला. प्रारंभी ऊस उत्पादक शेतकरी नागराज पाटील व त्यांच्या पत्नी कल्पना पाटील यांच्या हस्ते पूजा केली. मान्यवरांच्या हस्ते लोकनेते बाबुराव पाटील अनगरकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अध्यक्षस्थानी माजी आमदार यशवंत माने होते.साखरेची एमएसपी ५००० रुपये करावी आणि उसाचा उतारा घटणार असल्याचे शेतकऱ्यांना अनुदान द्यावे अशी मागणी कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी यावेळी केले.
बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात शेतकरी व सभासदांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष विक्रम पाटील म्हणाले की, आगामी गळीत हंगाम प्रतिकूल परिस्थितीत सुरू करावा लागत आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उसाची अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे टनेज आणि उतारा कमी येण्याची शक्यता आहे. त्यातच औषधांच्या दरात दीडपटीने वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर साखरेची एमएसपी ५००० रुपये करावी. आणि रिकव्हरी दोन टक्क्यांनी घटणार असल्याने शेतकऱ्यांना एक हजार रुपयांचे अनुदान सरकारने द्यावे. यावेळी कार्यक्रमास सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, सभापती अस्लम चौधरी, प्रकाश चवरे, लखन शिंदे आदी उपस्थित होते.


















