कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या कष्टाचा व घामाचा योग्य मोबदला म्हणजेच योग्य ऊसदर जाहीर झाल्याशिवाय एकही टोळी शेतात उतरू दिली जाणार नाही, असा इशारा विठ्ठल मुरारी कोळेकर यांनी दिला. येत्या १० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऊस परिषदेपूर्वी कोणत्याही परिस्थितीत ऊस तोडणी सुरू करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. आक्रमक झालेल्या कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी येथील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी अन्नपूर्णा साखर कारखाना प्रशासनाला निवेदन दिले. जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत दराबाबत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत ऊस तोडणीची कोणतीही घाई कारखान्यांनी करू नये. अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. शेतकऱ्यांच्या या भूमिकेची तत्काळ दखल घेत कारखाना प्रशासनाने ऊसतोड तत्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला.
अन्नपूर्णा जॅगरी कारखान्याच्या प्रशासनाने तत्परतेने पावले उचलत परिसरातील ऊसतोड थांबवण्याचे आदेश दिले. राज्यभरात आगामी ऊस हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस दर आंदोलनाची धग निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोगनोळी परिसरातील शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. यावेळी बाळासो कोळेकर, बाहुबली पाटील, संजय डूम, विठ्ठल कोळेकर, अरुण पाटील, सचिन परीट, आण्णासो चौगुले, आप्पासो आबणे, संतोष पाटील, दत्तात्रय डूम, बबन डूम, महावीर चौगुले, विजय चौगुले, सुशांत डूम, राजेंद्र चौगुले, अनिल खोत, उत्तम पाटील, सागर पाटील, मारुती घरमोडे, अमोल पाटील, अमोल डूम, अनिल पाटील यांच्यासह कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.


















