सोलापूर : ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक, साखर कारखान्यांसमोर गाळप सुरू होण्यापूर्वीच आव्हान!

सोलापूर : राज्यात १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील साखर कारखाने आगामी गाळप हंगामाच्या तयारीत गुंतले आहेत. असे असताना १५ ऑक्टोबरला गाळप सुरू करण्याच्या निर्णयाला शेतकरी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. तसेच ऊस दराचा मुद्दाही तापला आहे. संघटनांनी दरवाढीचा प्रश्न न सुटल्यास ३० सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे सोलापूरच्या साखर कारखान्यांसमोर गाळप सुरू होण्यापूर्वीच आव्हान उभे राहिले आहे.साखरेची एमएसपी व इथेनॉल दरवाढीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संघटनांनी केल्या आहेत. एकूणच ऊसदर, गाळपाची तारीख आणि ऊसतोडणी-वाहतूक दरावरून आंदोलनांचे वातावरण तापले आहे. शेतकरी संघटनांनी याप्रश्नी २९ सप्टेंबरला हुबळीत आंदोलन, पुण्यात साखर आयुक्तालयावर ८ ऑक्टोबरला मोर्चा आणि ५ ऑक्टोबरपासून दिल्लीत जंतरमंतरवर ठिय्या आंदोलनाची घोषणा केली आहे.

साखर हंगामात ऊस तोडणी मजुरांनी ऊसतोडणी दर सध्याच्या ३६६ रुपयांवरून ४५० रुपये प्रतिटन करण्याची मागणी केली आहे. साखरेची एमएसपी ५० रुपये करावी अशी मागणी साखर कारखानदारांबरोबरच शेतकरी संघटनांची आहे. शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी ऊसदर संघर्ष समितीच्या माध्यमातून जंतरमंतरवर आंदोलन करणार आहेत. पाच ऑक्टोबरपासून हे आंदोलन सुरू होईल. सोलापूरसह राज्यभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास राऊत यांनी दिली. पुण्यात साखर आयुक्तांना निवेदन देऊन १५ नोव्हेंबरपूर्वी कारखाने सुरू करू नयेत, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास ८ ऑक्टोबरला साखर आयुक्तालयावर मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी ऊसतोडणी व वाहतूकदारांच्या दराचा प्रश्न गाळप हंगामाच्या सुरुवातीला महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या ३६६ रुपये प्रतिटन असलेला दर वाढवून ४५० रुपये करावा, अशी मागणी आहे. दराचा प्रश्न न सुटल्यास ३० सप्टेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. कारखाने गाळप हंगामासाठी तयारी करत असताना आंदोलनांचा कालावधी निर्णायक ठरणार आहे. गाळपाची तारीख, तोडणी वाहतूक दर आणि ऊसदर यावर तोडगा निघाला नाही, तर नियोजनावर परिणाम होणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here