पुणे : जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊस पिकावर झालेला हुमणीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनली आहे. हुमणीमुळे शेकडो हेक्टर ऊस धोक्यात आला आहे. परिणामी, उत्पादन घटून शेतकरी कारखानदारांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही धोकादायक मानली जाणारी हुमणी किड आता भुईमुगाच्या शेतात पसरली आहे. हुमणीच्या अळ्या जमिनीखाली राहून पिकांची मुळे कुरतडतात. प्रादुर्भाव वेगाने वाढत असल्याने पीक जळून खाक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हुमणीवर नियंत्रणासाठी सध्या जोरदार पाऊस हाच एकमेव उपाय शेतकऱ्यांना दिसत आहे. जोरदार पावसानंतर शेतात पाणी साचून राहिले, तरच हुमणीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, अशी शक्यता आहे.आधीच बियाणे, खते, मशागतीमुळे आर्थिक संकटात असणाऱ्या बळीराजावर या अतिरिक्त खर्चाचा प्रचंड ताण आला आहे.
यंदा पिकांची उत्तम वाढ पाहता यंदा चांगल्या उत्पन्नाची आशा होती. किडींचे नियंत्रण वेळेत झाले नाही तर भुईमुगाच्या उत्पादनात घट होण्याची मोठी धास्ती आहे. त्यामुळे कृषी विभागाने तत्काळ पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना कीटकनाशकांचा योग्य वापर आणि जैविक उपायांचे प्रभावी मार्गदर्शन करावे, अशी मागणी जोर धरत आहे. खरीप हंगामात ऊस, मका, भुईमूग पिकांवर हुमणी किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. यावर्षी ऐन पावसाळ्यात पडलेला खंड, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रतेमुळे वाल्हे परिसरातील विविध गावांमध्ये विविध पिकांवर हुमणी किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. हुमणीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरीवर्ग संकटात सापडले आहे. हुमणी किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटकनाशकांची वारंवार फवारणी करावी लागत आहे. एकापेक्षा अधिक वेळा फवारणी करावी लागत असल्याने औषधे, मजुरी, यंत्रांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.


















