सातारा : फायनल ऊस दर, पहिली उचल ठरवण्यासाठी संयुक्त बैठक घेण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

सातारा : जिल्हास्तरावर ऊस उत्पादक शेतकरी संघटना, प्रशासन व साखर कारखानदारांची संयुक्त बैठक घ्यावी आणि जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व साखर कारखान्यांना पहिली उचल व अंतिम देयकासह ऊसदर जाहीर करणे बंधनकारक करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. मागील हंगामात मिळालेल्या अंतिम दरावर प्रतिटन किमान ३०० रुपयांची वाढ द्यावी. इथेनॉल, वीज निर्मिती, प्रेसमड, बगॅस, मळी व इतर उपपदार्थांमधून मिळणाऱ्या नफ्याचा योग्य वाटा ऊस शेतकऱ्यांना उत्पादक देण्यासाठी राज्य शासनाकडे विशेष प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली.

याबाबत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील अनेक वर्षांपासून सहकारी व खासगी साखर कारखानदारांकडून राज्य शासनाच्या विविध आदेशांचे सातत्याने उल्लंघन होत आहे. यावर्षी रासायनिक खते, बियाणे, मजुरी, डिझेल, ट्रॅक्टर मशागत, सिंचन, वाहतूक व शेतीसाठी आवश्यक सर्व घटकांच्या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच अपुरा पाऊस, उन्हाळ्यातील पाणीटंचाई व हवामानातील अनिश्चितता यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ऊस दरात वाढ गरजेची आहे. त्यासाठी संयुक्त बैठक घेऊन निर्णय घ्यावा. ऊस वजनातील काटामारी, बेकायदेशीर कपात, वाहतूक खर्चातील अनियमितता व इतर आर्थिक शोषण रोखण्यासाठी विशेष तपास पथके तातडीने नियुक्त करण्यात यावीत. जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी अर्जुनभाऊ साळुंखे, मनोहर येवले, रमेश पिसाळ, राजू घाडगे, मोहन घाडगे, सुधाकर शितोळे, संदीप काळंगे, अमोल पवार, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here