कोल्हापूर : गुऱ्हाळावर उसाला तोडणी-वाहतुकीसह प्रतिटन ३,५०० रुपयांपर्यंत दर, साखर कारखान्यांशी दराची स्पर्धा

कोल्हापूर : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होत असला तरी कागल तालुक्यातील अनेक गुऱ्हाळघरे सुरु झाली आहेत. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर दराच्या मुद्द्यावरून शेतकरी संघटना, ऊस उत्पादक आणि कारखाना व्यवस्थापन यांच्यात आंदोलने व वाद निर्माण होतात. त्यापूर्वीच गुऱ्हाळघरांकडून दिला जाणारा प्रतिटन ३ हजार ५०० रुपयांपर्यंतचा दर दिला जात आहे. त्वरित एकरकमी पेमेंट, कपात नसणे आणि आगाऊ रक्कम देण्याची पद्धत यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्येही समाधान आहे. पाच किलोमीटरच्या परिसरातील उसाची वाहतूक प्रामुख्याने केली जात आहे. गुऱ्हाळ मालकांनी आता साखर कारखान्यांच्या दराशी बरोबरी करणारा दर देण्यास सुरुवात केली आहे. ऊस दराच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी तोडणी व वाहतुकीसह प्रतिटन ३ हजार ५०० रुपयांपर्यंत दर दिला जात आहे. गुऱ्हाळ मालकांनी स्वतःची वाहने तसेच ऊसतोडणीच्या टोळ्या तयार केल्या आहेत.

कागल परिसरात गुऱ्हाळ घरांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, काही गुऱ्हाळघरे आता बारमाही सुरू ठेवली जात आहेत. पावसाळ्यात स्थानिक भागातील ऊस उपलब्धतेवर मर्यादा येत असल्याने कर्नाटकातील घटप्रभा, रायबाग, आरग, बेडग आदी भागांतून ऊस आणून गुऱ्हाळ व्यवसाय सुरू ठेवला जातो. ऊस गेल्यानंतर महिन्याच्या आत एकरकमी रक्कम अदा केली जात असल्याने शेतकऱ्यांचा गुऱ्हाळघरांकडे कल वाढू लागला आहे. गुऱ्हाळ मालकांनी ऊस कोणत्याही ठिकाणी वजन करून आणला, तरी त्याची वजनाची पावती ग्राह्य धरण्याचा निर्णय घेतला आहे. पावती सादर केल्यानंतर ऊस स्वीकारला जात असल्याने शेतकऱ्यांना वाहतूक व वजनाच्या प्रक्रियेत अधिक सुलभता मिळत आहे. कोणत्याही प्रकारची कपात न करता रक्कम देणे, तसेच अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आगाऊ पैसे उपलब्ध करून देणे, यामुळे गुऱ्हाळघरांकडे ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. काही गुहऱ्हाळघरांकडे तर ऊस देण्यासाठी प्रतीक्षा यादी निर्माण होऊ लागली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here