कोल्हापूर : सोनवडे (ता. शाहूवाडी) येथील उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याची ३२ वी सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष गणी ताम्हणकर होते. सभेत संचालक रणवीरसिंग गायकवा़ड यांनी साखर कारखाना चालू गळीत हंगामात सहा लाख मे.टनाचे उद्दिष्ट पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी जास्तीत जास्त ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यंनी केले.
संचालक गायकवाड म्हणाले की, यावर्षी उसाचे उत्पादन थोडे कमी असले तरी आपल्या परिसरात ऊस चांगला आहे. गाळपासाठीची सर्व यंत्रणा सज्ज असून इतर कारखान्यांबरोबर कारखाना वेळेत सुरू करण्यात येईल. सभेत सुरुवातीला कार्यकारी संचालक भगवानराव पाटील यांनी अहवाल वाचन केले. संचालक पृथ्वीराज खानविलकर, विठ्ठल पवार, शामराव लाळे, प्रकाश कांबळे, पंडित थोरात, सदाशिव पाटील, जगन्नाथ जोशी, अनिल पाटील, उदय पाटील, तानाजी पाटील, दीपक शेळके, वाहतूकदार, कंत्राटदार, सभासद, शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.


















