सांगली : दरवर्षी एफआरपी आणि साखर उत्पादन खर्चात वाढ होत असल्याने साखर कारखानदारी आर्थिक अडचणीत आली आहे. कारखान्यांच्या गळीत हंगामाचे दिवसही वर्षानुवर्षे कमी होत असून, ते ९० ते १०० दिवसांवर आले आहेत. त्यामुळे एआय’, ठिबक सिंचन यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एकरी ऊस उत्पादन वाढविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याच्या ४४ व्या बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखाना उभारला. अण्णांच्या त्यागातून उच्चांकी ऊसदर देणारा हुतात्मा कारखाना नावारुपास आला. आता साखर कारखान्यांनी आपापसांतील स्पर्धा थांबवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा देता येईल, यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांनी साखरेच्या दरवाढीच्या काळात कमी प्रमाणात साखर विक्री झाल्याने दरवाढीचा अपेक्षित फायदा साखर कारखानदारीला मिळाला नाही असे सांगितले. सचिव मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याच्या अध्यक्षा जयश्री अहिर यांनी आभार मानले. यावेळी हुतात्मा बँकेचे अध्यक्ष किरण नायकवडी, केदार नायकवडी, उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, संचालक, कार्यकारी संचालक शिवाजी पाटील, अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















