साखरेच्या एमएसपीसह इथेनॉल दरवाढीसाठी दिल्लीतील आंदोलनासाठी जिल्ह्यातून शेकडो शेतकरी रवाना

सोलापूर : साखरेचा एमएसपी ३० रुपयांवरून ५० रुपये प्रतिकिलो करावी आणि इथेनॉलचा दर ७० ते ७५ रुपये प्रतिलिटर करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील दिल्ली शेतकरी आंदोलन सर्व शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी दिल्ली येथे जंतर मंतर वर ५ व ६ ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, महादेव जानकर आणि रविकांत तुपकर यांच्यासह राज्यातील विविध शेतकरी नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेकडो शेतकरी जंतर-मंतरवरील आंदोलनासाठी रवाना झाले. साखरेला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे, घरगुती व औद्योगिक साखरेचे स्वतंत्र कोटे आणि दर निश्चित करावेत तसेच दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी, ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी साखर कारखाने आणि कामगारांचे प्रश्न सोडवावेत अशा प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

पंढरपूर, अकलूज, मंगळवेढ्यामधून ऊस उत्पादक शेतकरी केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होत आहेत. पंढरपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयतक्रांती शेतकरी संघटना, बळीराजा शेतकरी संघटना, क्रांतिकारी शेतकरी संघटना, मनसे, संभाजी ब्रिगेड या शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र झाले. श्री विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीचे दर्शन घेऊन सरकारला सद्बुद्धी दे, शेतकऱ्याच्या उसाला भाव मिळू दे, असे साकडे घालून दिल्लीकडे निघाले. यावेळी शेतकरी संघटनेच्या नेते दीपक भोसले, प्रा. सुहास पाटील, समाधान फाटे, सचिन पाटील, माऊली जवळेकर, निवास नागणे, सालगुडे पाटील, विनोद बागल, अजित बोरकर, पद्माकर बागल, शहाजी जगदाळे, अण्णा गायकवाड, अनिल बागल यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. पंढरपूरच्या महाराष्ट्र ऊस परिषदेच्यावतीने अकलूज येथील ग्रामदेवता अकलाई देवीचे दर्शन घेऊन शेतकरी रवाना झाले. अकलूज येथून आंदोलकांची वाहन व्यवस्था केली असून बसमधून शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. आंदोलनात महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे दीपक भोसले, सुहास पाटील, सचिन पाटील, अजित बोरकर, भानुदास सालगुडे पाटील या आयोजकांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here