सांगली : म्हैसाळ सिंचन योजनेतून सध्या परिसरातील तलाव पिण्याच्या पाण्यासाठी भरले जात आहेत. मात्र, काही भागांतील शेती पाण्याअभावी अडचणीत आली असून अंतिम टप्प्यात असलेल्या ऊस पिकाला पाण्याची प्रतीक्षा आहे. सध्या उसाला पाणी मिळाले नाही तर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. बंधारे न भरल्यास आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी माणिकराव भोसले यांनी दिला आहे.
माणिकराव भोसले यांनी सांगितले की, रांजणी ते लोणारवाडी हद्दीतील बंधारे भरल्यास परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून म्हैसाळ योजनेचे पाणी बंधाऱ्यांमध्ये सोडण्याची कार्यवाही करावी. अंतिम टप्प्यात आलेल्या ऊस पिकाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे रांजणी कवठेमहांकाळ) परिसरातील रांजणी ते लोणारवाडी हद्दीतील सर्व बंधारे, म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याने भरून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीची दखल न घेतल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.


















