कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यातर्फे शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध ऊस विकास योजनांमुळे यंदाच्या गाळप हंगामासाठी सुमारे २० हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. १८ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस जवाहर साखर कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे यांनी केले.
येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ऊस गाळप हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी माजी मंत्री आवाडे बोलत होते. किशोरी आवाडे, आमदार डॉ. राहुल आवाडे आदी प्रमुख उपस्थित होते. माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, ऊस गाळपासाठी कारखान्याची मशिनरी व सर्व यंत्रणा सज्ज होत आहे. ऊस तोडणी वाहतुकीसाठी ३५२ ट्रक ट्रॅक्टर, ७१४ अंगद व डंपिंग, २९३ बैलगाड्या आणि ऊस तोडणी ७५ मशीन इतक्या तोडणी वाहतूक यंत्रणेचे करार झालेले आहेत.
‘चीनीमंडी’शी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी म्हणाले कि, कारखान्यातर्फे गाळप हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. ऊस तोडणी आणि वाहतुकीचेही योग्य नियोजन करण्यात आले आहे. मागीलवर्षी कारखान्याने सुमारे १४ लाख ९० हजार टन उसाचे गाळप केले होते. यंदा अठरा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी यंत्रणा सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. गाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचाही आढावा घेतला जात असल्याचे जोशी यांनी सांगितले.
बॉयलर अग्निप्रदीपनप्रसंगी उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, मौश्मी आवाडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, केन कमिटी चेअरमन दादासाहेब सांगावे, संचालक सूरज बेडगे, हुपरीचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रणदिवे, नगरसेवक अमेय जाधव, गणेश वाईंगडे, अलका वाईंगडे, भारती नायकवडे, माजी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे आदी उपस्थित होते.


















