कोल्हापूर : ‘साखर कारखाने आपल्या अडचणी सांगून तुमचा ऊस यंदाही कमी दरात घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. गावागावांत असलेल्या त्यांच्या बगलबच्चांमार्फत आणि पोलिसांच्या बळावर कारखाने दमदाटीने ऊस तोडी देतील. त्या त्या गावांनी एकजुटीने ऊस तोडी रोखाव्यात. संघटना जोपर्यंत सांगत नाही, तोपर्यंत कोणीही ऊस तोडी घेऊ नयेत’, असे आवाहन ‘आंदोलन अंकुश’चे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी केले. अकिवाट (ता. शिरोळ) येथील शेतकरी जागर सभेत ते बोलत होते. जागर सभेच्या अध्यक्षस्थानी कुमार तवंदकर होते. यावेळी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
बैठकीत शेतकरी नेत्यांनी सांगितले की, देशाच्या साखर कारखानदारीच्या इतिहासात इतकी साखरेची टंचाई कधीही निर्माण झाली नाही. देशात साखर शिल्लक नाही आणि दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षीही साखरेचे उत्पादन गरजेपेक्षा कमी होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षभर साखरेचा बाजारात तुटवडा राहणार असल्यामुळे कारखान्यांना साखरेला उच्चांकी दर मिळणार आहे. शेतकऱ्यांनी संयम ठेवल्यास उसाला दणदणीत दर मिळू शकतो. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. संघटनेचे रशीद मुल्ला, बंटी माळी, चंदू पाटील, अप्पासाहेब म्हैशाळे, आझाद मकानदार, रशीद पटेल, उत्तमसिंग रजपूत, बाळू उमाजे, अनिल वळवाडे, निंगाप्पा कट्टेकरी, कुमार गज्जनावर आदी उपस्थित होते.


















