पुणे : शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ या २६ व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी (दि. ५) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा नीरा-भीमा कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील होत्या. सत्यनारायण पूजा संचालक सुभाष गायकवाड व उज्वला गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली. गव्हाण पूजन व काटा पूजन संचालक विजयराव व लतिका घोगरे यांच्या हस्ते झाले. यंदाचा गळीत हंगाम दुष्काळाच्या छायेत सुरू होत आहे. विविध कारणांनी साखर उद्योगासमोर अडचणी निर्माण झाल्या असताना, आपल्या कारखान्याने यंदा ६ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कारखाना ऊस दरामध्ये मागे राहणार नाही अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातील साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे आभार मानले. ते म्हणाले की, साखर उद्योगासाठी आम्ही केंद्राकडे काही मागण्या मांडल्या आहेत. साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ५० रुपये करावी, दुष्काळामुळे गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एक हजार रुपये अनुदान द्यावे, साखर उद्योगाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आवश्यक धोरणात्मक मदत करावी आणि दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात यांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी माजी अध्यक्ष लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, अॅड. कृष्णाजी यादव, शिवाजी हांगे, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, उमेश पाटील, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कालिदास आवाड यांनी केले.


















