पुणे : राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत असून, पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर साखर कारखाने यंदा केवळ तीन महिनेच सुरू राहण्याची शक्यता असल्याचे मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आगामी संकटाची जाणीव ठेवून आतापासूनच नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. कोऱ्हाळे खुर्द-निंबाळकर येथे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारादरम्यान सभासदांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, नुकताच राज्याचा दुष्काळी दौरा केला. या दौऱ्यात अनेक भागांमध्ये पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे दिसून आले. आपल्या भागात सध्या हिरवीगार पिके आणि वडगाव पाटातून वाहणारे पाणी पाहून समाधान वाटते; मात्र ही परिस्थिती कायम राहीलच, असे नाही. आपला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. त्यामुळे निवडणुकीत कोणतेही पॅनल सत्तेवर आले, तरी आगामी काळात ऊस पिकविणे आणि तो जगविणे हे मोठे आव्हान असणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. त्यानंतर उपलब्ध पाण्याचे शेतीसाठी नियोजन करावे लागणार आहे. पाऊस वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात पडेल की नाही, हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून आतापासूनच तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, “सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते. मात्र आता निवडणूक होत आहे. साखर कारखान्याच्या कामकाजाचा माझा अभ्यास झाला आहे. आगामी काळात शेतकऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या विविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी नियोजन करणे आवश्यक आहे,” असे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.


















