पुणे : पाटस (ता. दौंड) येथील भीमा पाटस कारखान्याच्या ४३ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ निराणी उद्योग समुहाचे अध्यक्ष मुरुगेश निराणी यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी आमदार राहुल कुल होते. कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवला जाईल. सर्व नफा ऊस दरासाठी वापरणार असल्याचे सांगत अध्यक्ष मुरुगेश निराणी यांनी यंदा १० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवल्याचे जाहीर केले. पुढील वर्षापासून कारखाना प्रतिदिन १५ हजार टन गाळप क्षमतेने चालेल. यासोबतच ५० मेगावॉट वीजनिर्मिती आणि ५०० केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प सुरू होईल, ज्यामुळे हा कारखाना भारतातील एक मॉडेल म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला कर्नाटकचे माजी कृषिमंत्री बी. सी. पाटील, माजी आमदार रंजना कुल, द्राक्षायाणी निराणी, कांचन कुल, आप्पासाहेब पवार, सुखदेव चोरमले, गणेश जगदाळे, नामदेव बारवकर, आनंद थोरात, सर्जेराव जेधे, योगेश कटारिया, शिवाजी नांदखिले आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार राहुल कुल म्हणाले की, निराणी ग्रुपने गेल्या तीन वर्षांतील अडचणींवर मात करून नफा-तोटा न पाहता कारखाना सक्षमपणे चालवला आहे. कारखान्याच्यावतीने चालू वर्षी जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने बाजारभाव दिला जाईल. संगमेश निराणी यांनी कारखाना सहकारातच ठेवण्यावर भर राहील आणि सभासदांच्या मागणीनुसार उसाची बिले वेळेवर दिली जातील असे जाहीर केले. कार्यक्रमात ऊस पुरवठादार व वाहतूकदार लक्ष्मण रांधवण, संदीप खराडे, नवनाथ बंडगर, अभिजित बोत्रे, अभिषेक पवार, संतोष गाडेकर, बाळू गट्टी, सरला सूर्यवंशी, लक्ष्मण हुतांबरे, रमेश राठोड, समाधान राठोड, सुनील चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. संतोष बिरादार यांनी प्रास्ताविक केले. तुषार पवार यांनी स्वागत केले. विकास शेलार यांनी सूत्रसंचालन केले, प्रकाश मते यांनी आभार मानले.


















