पुणे : जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बुधवारी (ता. ७) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते आणि आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी जास्तीत जास्त गाळप आवश्यक आहे. २०२६-२७ च्या हंगामासाठी कार्यक्षेत्रात १९,५०० एकर ऊस उपलब्ध असून, कार्यक्षेत्राबाहेरील ऊसही आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यंदाच्या हंगामात १० लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून कारखाना प्रतिदिनी साडेआठ हजार टन गाळप करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच शेतकऱ्यांची मागील ऊस बिले आणि कामगारांना बोनस दिवाळीपूर्वी अदा करणार असल्याची घोषणा अध्यक्षांनी केली.
प्रास्ताविकात कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर म्हणाले, केंद्राने एफआरपी वाढवली, पण साखरेचा एमएसपी दर सात वर्षांपासून स्थिर आहे. इथेनॉल व वीज दरातही वाढ नाही. त्यामुळे एफआरपी देणे अवघड झाले आहे. इथेनॉल व वीज निर्मितीसाठी योग्य धोरणाअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. सरकारने इथेनॉल, वीजनिर्मितीला चालना देण्याची गरज असून केंद्राने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) व इथेनॉल दरात वाढ करावी अशी आमची मागणी आहे. दरम्यान, यावेळी खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे साखर कारखानदारी अडचणीत सापडली आहे. अडचणीच्या काळातही कारखाना सुरळीत चालविल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले. कार्यक्रमात आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. माजी आमदार दिलीप ढमढेरे, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी स्वागत केले. सुहास शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष अशोक घोलप यांनी आभार मानले.


















