अहिल्यानगर : बाहेर वजन करा, पुन्हा आमच्या काट्यावर तोला! पंचगंगा कारखान्याचे खुले आव्हान

अहिल्यानगर : “आमच्या वजन काट्यावर संशय असेल, तर बाहेर कुठेही वजन करून पावती आणा. त्याच वाहनाचे आमच्या काट्यावर पुन्हा वजन करू. एक ग्रॅमचाही फरक आढळणार नाही,” असे खुले आव्हान पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहे. कारखान्याचे मार्गदर्शक प्रभाकरशिंदे यांनी ही भूमिका मांडत वजन काट्याच्या अचूकतेबाबत शेतकऱ्यांना खात्री देण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या ऊस उत्पादक शेतकरी विविध अडचणींचा सामना करत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला असून, उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत कारखान्याच्या वजन काट्यावर उसाचे वजन कमी दाखवले जात असल्याच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. वर्षभर कष्ट करून पिकवलेल्या उसाच्या प्रत्येक कांडीला महत्त्व असल्याने आपल्या उसाचे अचूक वजन किती झाले, हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरत आहे.

वजनाची पडताळणी करण्याची खुली मुभा

ChiniMandi WhatsApp Channel

या पार्श्वभूमीवर पंचगंगा कारखान्याने शेतकऱ्यांना बाहेरील वजन काट्यावर वजन करून त्याची पावती आणण्याचे आवाहन केले आहे. बाहेरील काट्यावर वजन केल्यानंतर त्याच वाहनाचे कारखान्याच्या काट्यावर पुन्हा वजन करण्यात येईल. दोन्ही वजनांमध्ये तफावत आढळल्यास त्याची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले.‘शेतकऱ्यांच्या उसावर नव्हे, तर त्यांच्या विश्वासावर कारखाना चालतो,’ अशी भूमिका व्यवस्थापनाकडून मांडण्यात आली आहे. वजनातील तफावत सिद्ध झाल्यास शेतकऱ्याने सांगितलेली शिक्षा भोगण्यासही तयार असल्याचे खुले आव्हान देण्यात आल्याने या भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.

इतर साखर कारखान्यांसमोरही प्रश्न

साखर उद्योगात वजन काट्याच्या अचूकतेबाबत अनेकदा शंका उपस्थित केल्या जातात. मात्र, शेतकऱ्यांना बाहेरील वजन काट्यावर वजन करून त्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची मुभा देण्याची भूमिका पंचगंगा कारखान्याने घेतल्याने या विषयाला नवी दिशा मिळाली आहे.पंचगंगा कारखाना शेतकऱ्यांना अशा प्रकारे पडताळणीची संधी देत असेल, तर तालुक्यातील इतर मोठे साखर कारखानेही अशीच मुभा देणार का, असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे.वजन काट्याच्या अचूकतेबाबत पारदर्शकता ठेवण्याचे पंचगंगा कारखान्याचे आव्हान आता चर्चेचा विषय ठरले असून, शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी इतर कारखाने कोणती भूमिका घेतात, याकडेही ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here