बीडमध्ये शॉर्टसर्किटमुळे सात एकर ऊस जळून खाक; शेतकरी कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान

बीड : शिरूर कासार तालुक्यातील निमगाव मायंबानजीक असलेल्या लमान तांडा शिवारात विद्युत तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सात एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी घडली. तोडणीसाठी तयार झालेल्या उसाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत ऊस पिकासह ठिबक सिंचन व्यवस्था आणि पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही जळून खाक झाले.

तोडणीला आलेल्या उसाचे मोठे नुकसान

ChiniMandi WhatsApp Channel

मिळालेल्या माहितीनुसार, लमान तांडा शिवारातील गट क्रमांक ८७८ मधील महिला शेतकरी चंद्रकला बाबूराव टिळक यांच्या शेतातील दोन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तर गट क्रमांक ८८० मधील चंद्रकला गोविंद घोडके, छाया सुनील घोडके आणि रेखा नानासाहेब घोडके यांच्या मालकीचा पाच एकर ऊसही जळून खाक झाला.या आगीत उसासोबतच पिकाला पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे ठिबक सिंचनाचे साहित्य आणि इतर शेतीपयोगी साहित्याचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

कष्टाने जगवलेले पीक आगीत भस्मसात

यंदा शिरूर कासार तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतीपिके जगवणे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरले होते. पाणीटंचाईचा सामना करत संबंधित शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने उसाचे पीक जगवले होते. ऊस तोडणीला आल्याने त्यातून आर्थिक उत्पन्न मिळण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.

महसूल विभागाकडून पंचनामा

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंडळ अधिकारी निशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी कृष्णा कायते यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. या नुकसानीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तोडणीच्या उंबरठ्यावर असलेले सात एकर ऊस पीक आगीत नष्ट झाल्याने संबंधित शेतकरी कुटुंबांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना आता मदतीची प्रतीक्षा आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here