धाराशिव : यंदा पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, कमी पावसामुळे सोयाबीनसह खरीप पिके करपून गेली आहेत. विहिरी व कूपनलिका कोरड्या पडू लागल्याने उसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे कारखान्याला ऊस गेल्यानंतर शेतकऱ्यांचे संपूर्ण क्षेत्र मोकळे होणार आहे. अशा परिस्थितीत उसापासून मिळणारे उत्पन्न हा शेतकऱ्यांसाठी आधार ठरणार आहे. त्यामुळे उसाला प्रतिटन ५,००० रुपये दर देण्याची मागणी करत खासमवाडी परिसरातील ऊस तोडणी बंद पाडण्यात आली. ऊस उपलब्ध नसल्याने खासमवाडीसह मोहा येथील कारखानेही बंद झाले आहेत.
यावेळी सिद्धिविनायक, मोहेकर व एस. पी. शुगर या कारखान्यांना शेतकरी दिलीप पाटील, दयानंद पाटील, अमोल पाटील, सतीश माने, चंद्रकांत पाटील, सचिन शेळके, शशिकांत पाटील, संदीप जाधव, अजित शेळके आदींनी निवेदन दिले. शेतकऱ्यांनी सांगितले की, अपुऱ्या पावसामुळे यंदा उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत साखर व गुळाचे दर वाढले आहेत. त्यामुळे उसाला प्रतिटन ५,००० रुपये दर द्यावा अशी आमची मागणी आहे. या मागणीसाठी शेतकऱ्यांनी खामसवाडी येथील ऊसतोडणी बंद पाडली. उसाला प्रतिटन पहिली उचल ४,१०० रुपये व अंतिम दर ५,००० रुपये द्यावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली मागणी मांडली. आता कारखानदारांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















