कोल्हापूर : पहाटे चार वाजताच दिवसाची सुरुवात, अंधारातच ऊसाच्या फडात हजेरी, हातात कोयता घेऊन दिवसभर ऊसतोडणी आणि संध्याकाळपर्यंत मोळ्या बांधण्याचे काम… हाताला फोड पडेपर्यंत राबून मिळणाऱ्या तुटपुंज्या मजुरीत संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची धडपड. साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होताच ऊसतोडणी मजुरांच्या जगण्याची ही संघर्षयात्रा पुन्हा सुरू झाली आहे. बीड, धाराशिव आणि परभणीसह दुष्काळी भागांतील शेकडो मजूर कुटुंबांसह कोल्हापूर जिल्ह्यात दाखल होत असून, ट्रक आणि ट्रॅक्टरमध्येच आपला संसार थाटून ते पुढील काही महिन्यांसाठी स्थलांतरित होत आहेत.
पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कष्टांची पराकाष्ठा
ऊसतोडणी मजुरांचा दिवस पहाटे चार वाजताच सुरू होतो. महिला सकाळीच कुटुंबासाठी भाकरी तयार करतात. त्यानंतर पहाटे पाच वाजेपर्यंत मजूर ऊसाच्या फडात पोहोचतात. ऊस तोडणे, त्याच्या मोळ्या बांधणे आणि त्या ट्रकमध्ये भरणे, असा दिवसभराचा कामाचा व्याप असतो. दुपारपर्यंत ऊसतोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी मजुरांची धावपळ सुरू असते. या साऱ्या प्रक्रियेत महिला आणि पुरुषांसोबत लहान मुलांनाही हातभार लावावा लागतो.अनेक ठिकाणी १२ ते १३ वर्षांची मुलेही आई-वडिलांसोबत ऊसतोडणीच्या कामात मदत करताना दिसतात. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अनेक मुलांना शिक्षण अर्धवट सोडून आई-वडिलांसोबत कारखान्याच्या परिसरात यावे लागते. पुढील सहा महिने ऊसाच्या फडाशेजारीच त्यांचा मुक्काम असतो. या काळात शाळा, अभ्यास आणि नियमित शिक्षणापासून त्यांची ताटातूट होते. एप्रिलमध्ये गावाकडे परतल्यानंतर अनेक मुलांना पुन्हा त्याच वर्गात बसावे लागते, तर काहींचे शिक्षण कायमचे थांबते.
साखरेच्या गोडव्यामागे मजुरांच्या घामाचा कडवट संघर्ष
राष्ट्रीय महामार्गावरून धावणारे ट्रक आणि ट्रॅक्टर केवळ वाहने नसतात, तर त्यांच्यासोबत स्थलांतरित होणारा एक संपूर्ण संसार असतो. साखर कारखान्यांच्या चिमण्यांतून धूर निघतो, साखरेची पोती भरली जातात; मात्र या गोडव्यामागे ऊसतोडणी मजुरांचा घाम, त्यांची उपासमार आणि त्यांच्या मुलांच्या अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाची वेदना दडलेली असते.पोटाची खळगी भरण्यासाठी होणारे हे स्थलांतर तातडीने थांबवणे शक्य नसले, तरी या काळात मजुरांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी प्रभावी उपाययोजना करणे शक्य आहे. मात्र, ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांबाबत सहानुभूती व्यक्त केली जात असली, तरी प्रत्यक्षात त्यांच्या अडचणी दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असल्याचे चित्र आहे.
दुष्काळाचा फटका; रोजगाराचे दिवसही घटण्याची भीती
यंदा मुंबई आणि कोकण वगळता राज्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतीवर संकट ओढवले आहे. साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध होण्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम ऊसतोडणी मजुरांच्या रोजगारावर होण्याची शक्यता आहे. दरवर्षी साधारण १८० दिवस काम मिळणाऱ्या मजुरांना यंदा केवळ १०० ते १२० दिवसच रोजगार मिळण्याची भीती आहे. आधीच दुष्काळामुळे गावाकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि रोजगाराचा अभाव आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कारखान्यांकडे स्थलांतर करण्याशिवाय अनेक मजुरांसमोर पर्याय उरत नाही.


















