अहिल्यानगर : चुंभळी (ता. पाथर्डी) येथील ऊस तोडणी कामगार महादेव ढाकणे यांचा मुलगा लहानू याने जिद्ध आणि चिकाटीच्या बळावर पोलिस दलात उपनिरीक्षक पद मिळविले आहे. लहानू हे २००६ मध्ये ठाणे ग्रामीण पोलिस दलात शिपाई म्हणून दाखल झाले होते. त्यांनी मात्र, अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. लहानू यांचा चुंभळी व टाकळी मानूर ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गहिनीनाथ शिरसाठ, मच्छिंद्र मानकर, जगदीश शिरसाठ, भीमराव फुंदे, मुसा शेख, राजेंद्र शिरसाठ उपस्थित होते.
चुंभळी येथील महादेव ढाकणे ऊस तोडणी मजुरीचे काम करतात. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवत त्यांचा मुलगा लहानू यांनी खात्यांतर्गत स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळविले. लहानू यांचे प्राथमिक शिक्षण चुंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. भवानी माता माध्यमिक विद्यालय टाकळीमानुर येथे पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून आनंद महाविद्यालय पाथर्डी येथे पदवीचे शिक्षण घेतले आणि पोलिस दलात दाखल झाला. त्यानंतर जिद्दीच्या जोरावर लहानू यांनी अधिकारी पदाचे घवघवीत यश मिळाले.


















