पुणे : सहकारी साखर कारखान्यांना दीर्घ मुदतीच्या कर्जावरील व्याज सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. खासगी कारखान्यांचा या योजनेत समावेश असला, तरी त्यांना व्याज अनुदान मिळणार नाही. त्यामुळे थकीत एफआरपी देण्यासाठी खासगी साखर कारखान्यांनाही ‘सॉफ्ट लोन’ द्यावे, अशी मागणी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा) ने केली आहे. २०२५-२६ च्या हंगामात राज्यात २१० साखर कारखाने सुरू होते. त्यात १०८ खासगी आणि १०२ सहकारी कारखान्यांचा समावेश होता.
राज्यातील साखर, सहवीज आणि इथेनॉल उत्पादनात खासगी कारखान्यांचा निम्म्यापेक्षा अधिक वाटा असल्याचा दावा ‘विस्मा’च्यावतीने करण्यात आला आहे. याबाबत ‘विस्मा’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्या मांडल्या आहेत. गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी या योजनेचा लाभ खासगी कारखान्यांना द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. सद्यस्थितीत साखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, कमी ऊस उपलब्धतेमुळे सर्वच साखर कारखाने आर्थिक अडचणीत असल्याचे ‘विस्मा’ने स्पष्ट केले आहे. सॉफ्ट लोनचा लाभ सर्वांना मिळला नाही तर सहकारी आणि खासगी कारखान्यांमध्ये योजनेच्या लाभाबाबत विषमता निर्माण होत असल्याचा दावा संस्थेचा आहे.


















