पुणे : राज्यातील साखर कारखान्यांना मंत्री समितीने १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांकडून ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेची सज्जता करण्यात येत आहे. येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना गाळप हंगामासाठी सज्ज झाला आहे. गळीत हंगाम व गव्हाणपूजन कार्यक्रम रविवारी (दि. ११) सकाळी नऊ वाजता संचालक मंडळाच्या हस्ते होणार आहे. यावर्षीच्या गाळप हंगामासाठी कार्यक्षेत्रामध्ये एकूण २३ हजार ६४८ एकर ऊस गळीतास उपलब्ध आहे. २३,६४८ एकर क्षेत्रामधून सुमारे आठ ते साडेआठ लाख टन ऊस गळीतास उपलब्ध होईल. मात्र, संचालक मंडळाने बारा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेचे नियोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कारखान्याच्यावतीने सांगण्यात आले की, हंगामामध्ये दैनंदिन साडेअकरा हजार ते बारा हजार टन उसाचा पुरवठा होणार आहे. गाळप हंगामाच्या दृष्टीने ऊसतोडणी व वाहतुकीच्या कामासाठी ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेचे करार पूर्ण झाले आहेत. कार्यक्षेत्रात आडसाली १२९५ एकर ऊस, पूर्वहंगामी १४३० एकर ऊस, सुरू २९२० एकर ऊस आणि खोडवा ६३४३ एकर ऊस उपलब्ध आहे. तर कार्यक्षेत्राबाहेरील ६,६५० एकर क्षेत्रातील गेटकेन उसाचे करार करण्यात आले आहेत. यामधून सुमारे तीन ते साडेतीन लाख टन गेटकेन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. ऊसतोडणी व वाहतुकीसाठी ४०५ ट्रॅक्टर, नऊशे पाच बैलगाडी, ८८० ट्रॅक्टर गाडी व दहा शुगर केन हार्वेस्टर मशीनचे करार करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्व सभासदांनी आपला ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व संचालक मंडळाने केले आहे.


















