पुणे : श्री छत्रपती कारखान्याचा गाळप हंगाम सुरू; १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

पुणे : श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रम रविवारी (दि. ११) सकाळी ९ वाजता संचालक मंडळाच्या हस्ते उत्साहात पार पडला. यंदाच्या हंगामात १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, त्यासाठी ऊसतोडणी आणि वाहतूक यंत्रणेचे नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. कारखाना गाळपासाठी सज्ज झाला असून, ऊसतोडणी व वाहतुकीची यंत्रणाही कार्यान्वित होण्याच्या तयारीत आहे.

२३ हजार एकरहून अधिक ऊस उपलब्ध

ChiniMandi WhatsApp Channel

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात यंदा अडसाली १,२९५ एकर, पूर्वहंगामी १,४३० एकर, सुरू २,२२० एकर आणि खोडवा ६,३४३ एकर असे एकूण ११,९८८ एकर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. कारखाना प्रशासनाच्या माहितीनुसार, गाळपासाठी उपलब्ध उसाचे एकूण क्षेत्र २३ हजार ६४८ एकर आहे. या क्षेत्रातून कारखान्याला सुमारे ८ ते साडेआठ लाख टन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. याशिवाय, कार्यक्षेत्राबाहेरील ६ हजार ६५० एकर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी गेटकेन करार करण्यात आले आहेत. त्यातून आणखी ३ ते साडेतीन लाख टन ऊस मिळण्याची अपेक्षा आहे. कार्यक्षेत्रातील आणि बाहेरील ऊस मिळून यंदा १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे नियोजन कारखान्याने केले आहे.

ऊसतोडणी आणि वाहतुकीसाठी भक्कम यंत्रणा

गाळप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी कारखान्याने ४०५ ट्रॅक्टर, २०५ बैलगाड्या, ८८० ट्रॅक्टरगाड्या आणि १० ऊसतोडणी हार्वेस्टर मशीनसाठी करार केले आहेत. या यंत्रणेच्या माध्यमातून दररोज साडेअकरा हजार ते १२ हजार टन ऊस कारखान्यात आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे.यंदाचा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व सभासदांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी कारखान्याला द्यावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक आणि संचालक मंडळाने केले आहे. सभासदांनी सहकार्य केल्यास कारखान्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल, तसेच आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठीही हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संचालक मंडळासह कामगारांची उपस्थिती

गाळप हंगामाच्या शुभारंभप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर, संचालक शरद जामदार, रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, निलेश टिळेकर, संतोष मासाळ, गणपतराव कदम, प्रशांत दराडे, कैलास गावडे, अजित नरुटे, विठ्ठलराव शिंगाडे, अनिल काटे, बाळासाहेब कोळेकर, माधुरी राजपुरे, सुचिता सपकळ, सतीश देवकाते, अशोक पाटील, मंथन कांबळे, योगेश पाटील, तानाजी शिंदे, हनुमंत घोळवे आणि सत्यवान चव्हाण उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव, कामगार नेते युवराज रणवरे, वाहतूक संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह कारखान्याचे कामगार, सभासद, ऊसतोडणी मुकादम आणि वाहतूकदार उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here