पुणे : राज्य सरकारने यंदा 15 ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरु करण्यास पर्वंडी दिली असली तरी राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच गाळप हंगामाला सुरुवात केली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील साखर कारखानेही गाळपासाठी सज्ज झाले आहेत. काही कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप सुरू केले आहे, तर काही कारखाने येत्या दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा हंगामावर दुष्काळाचे सावट असल्याने साखर कारखान्यांसमोर पुरेसा ऊस उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांमध्ये चढाओढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे उसाच्या उपलब्धतेवर परिणाम
यंदाच्या हंगामात राज्यातील अनेक भागांत पावसाचा लहरीपणा आणि पाण्याच्या उपलब्धतेतील अनिश्चितता यांचा परिणाम ऊस पिकावर झाला आहे. काही भागांत उसाची अपेक्षित वाढ झालेली नसल्याने उपलब्ध उसाचे क्षेत्र आणि प्रत्यक्ष गाळपासाठी मिळणारे ऊसाचे प्रमाण याबाबत कारखाना व्यवस्थापनाकडून नियोजन केले जात आहे. उसाच्या वजनातही मोठी घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र हा राज्यातील साखर उत्पादनाचा महत्त्वाचा पट्टा मानला जातो. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील कारखान्यांसाठी यंदाचा हंगाम महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील कारखान्यांनाही पाणीटंचाई आणि उसाच्या उपलब्धतेच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. गाळप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी कारखान्यांना ऊसतोडणी आणि वाहतूक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले आहे.
पुरेसा ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांची धडपड
यंदा उसाची उपलब्धता मर्यादित राहण्याची शक्यता लक्षात घेता कारखान्यांमध्ये ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. गाळप क्षमता मोठी असलेल्या कारखान्यांना ती पूर्ण क्षमतेने वापरण्यासाठी सातत्याने ऊस पुरवठा होणे आवश्यक आहे. मात्र, उपलब्ध ऊस अपेक्षेपेक्षा कमी राहिल्यास गाळपाचे उद्दिष्ट साध्य करताना अडचणी निर्माण होऊ शकतात.यासाठी कारखाने ऊसतोडणी टोळ्या, ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाड्या आणि हार्वेस्टर यंत्रणांच्या उपलब्धतेवर भर देत आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क ठेवणे, तोडणीचे वेळापत्रक निश्चित करणे आणि वाहतुकीतील अडथळे दूर करणे याला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यक्षेत्रातील उसाबरोबरच आवश्यकतेनुसार बाहेरील क्षेत्रातील उसासाठीही काही कारखान्यांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे.
शेतकऱ्यांसाठी ऊसदराचा मुद्दा महत्त्वाचा
कारखान्यांमध्ये उसासाठी चढाओढ निर्माण झाल्यास ऊसदर, पहिली उचल आणि वेळेवर ऊसबिले मिळण्याच्या मुद्द्यांनाही महत्त्व येणार आहे. शेतकरी आपला ऊस कोणत्या कारखान्याला द्यायचा, याबाबत निर्णय घेताना दरासोबतच तोडणीची वेळ, वाहतूक व्यवस्था याला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. दरम्यान, यंदाचा गाळप हंगाम किती काळ चालेल आणि कारखान्यांना अपेक्षित ऊस उपलब्ध होईल का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. दुष्काळी परिस्थिती, उसाची उपलब्धता आणि कारखान्यांचे नियोजन या तीन बाबींवर यंदाच्या हंगामाचे चित्र अवलंबून राहणार आहे. त्यामुळे साखर कारखाने, ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचे लक्ष आता हंगामाच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.
गाळप हंगामाबाबत ‘चीनीमंडी’शी बोलताना ‘नॅचरल शुगर’चे संस्थापक, अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले कि, नॅचरल शुगरने आगामी गाळप हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३३०० रुपये पहिली उचल देण्यात येणार आहे. पाण्याअभावी ऊस अधिक वाळला असल्यास पंचनामा करून तो प्राधान्याने गाळपासाठी घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.


















