सांगली : ऊसदराचा निर्णय न घेताच साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक कार्यकर्त्यांनी रोखली. त्यामुळे जिल्ह्यात ऊसदराचा प्रश्न ऐरणीवर आला असून, आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कृष्णा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक अडवली
कराड आणि सांगली जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याने ऊसदर निश्चित न करताच गळीत हंगाम सुरू ठेवल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदराचा निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली होती. मात्र, कारखाना प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले.वाळवा तालुक्यातील शिवनगर येथील कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक बहे पुलाजवळ रोखण्यात आली. यावेळी सुमारे ४० ते ५० ट्रॅक्टरमधील ऊस अडविण्यात आला, तर सहा ते सात बैलगाड्यांची हवा सोडण्यात आली.
पहिली उचल प्रति टन ४,५०० रुपये मिळाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू देणार नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे. ऊस उत्पादनासाठी लागणारा खर्च वाढला असून, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.या आंदोलनात भागवत जाधव, संतोष शेळके, प्रदीप नागरे, प्रताप पाटील, शहाजी पाटील, गणेश शेवाळे, दत्तात्रय जाधव, रामचंद्र देवकुळे, कृष्णा कुंभार यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बावची फाट्यावर हुतात्मा कारखान्याची वाहतूक रोखली
वाळवा तालुक्यातील बावची फाटा परिसरात पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक कार्यकर्त्यांनी रोखली. यावेळी उसाला प्रतिटन साडेचार हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी करण्यात आली. वाढती महागाई, खते, कीटकनाशके, मजुरी आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे ऊस उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून पहिली उचल द्यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत ऊस वाहतूक रोखून कारखाना व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यात आले. मागण्यांवर लवकर निर्णय न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विश्वास कोळी, संघटनेचे नेते भागवत जाधव, जगन्नाथ भोसले, बाबासाहेब सांद्रे, संतोष शेळके, सचिन यादव, काशिनाथ निंबाळकर, दत्ताजी जाधव, अरुण कवठेकर, शामराव जाधव, बबलू जमादार यांच्यासह संघटनेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


















