सहा हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाचा लाभ देणार; समर्थ साखर कारखान्याचा पुढाकार

जालना : आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस शेती अधिक फायदेशीर आणि शाश्वत करण्यासाठी समर्थ सहकारी साखर कारखान्याने पुढाकार घेतला आहे. कारखान्याच्या माध्यमातून सहा हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हे तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार आहे. कमी खते आणि कमी पाण्याचा वापर करून उत्पादन वाढवावे, उसाचे पाचट जाळण्याऐवजी त्याचा जमिनीसाठी उपयोग करावा आणि वसंत ऊर्जेचा वापर करावा, असे आवाहन माजी मंत्री राजेश टोपे यांनी केले.

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कारखान्याच्या वतीने आवश्यक प्रयत्न केले जातील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. अरगडे गव्हाण (ता. घनसावंगी) येथील प्रगतिशील शेतकरी रंजित गुजर यांच्या शेतात कर्मयोगी अंकुशराव टोपे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘आठवणी साहेबांच्या’ आणि ‘आधुनिक तंत्रज्ञान व एआयच्या मदतीने शेतीचे नवे पर्व’ या विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. ऊसतोडणीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात राजेश टोपे बोलत होते.

ChiniMandi WhatsApp Channel

कमी पाण्यात अधिक उत्पादनासाठी एआयचा वापर

कृषी विज्ञान केंद्राचे एआय प्रकल्पप्रमुख तुषार जाधव म्हणाले की, मराठवाड्यातील ऊस उत्पादक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीत प्रगती करीत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. कमी पाण्यात ऊस उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. सध्या सुमारे पाच हजार शेतकरी एआय तंत्रज्ञानाचा लाभ घेत आहेत. आगामी काळात ही संख्या दहा हजारांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

‘व्हीएसआय’चे समाधान सुरवसे यांनी जमिनीची क्षमता आणि गरज ओळखून सेंद्रिय खतांचा वापर करण्याचे आवाहन केले. अधिक रासायनिक खते आणि अधिक पाणी दिल्याने ऊस उत्पादन हमखास वाढतेच असे नाही. त्यामुळे योग्य पीक व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ठिबक सिंचन, पाणी व्यवस्थापन आणि ऊस उत्पादन वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

एकरी १०० मेट्रिक टन उत्पादनाचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून एकरी १०० मेट्रिक टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि उसाचे पाचट न जाळता ते जमिनीत कुजवावे. यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होईल, असेही सांगण्यात आले.

२० गावांतील शेतकऱ्यांचे गट तयार करणार

समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहा हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत एआय तंत्रज्ञान पोहोचविण्याची योजना असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. यासाठी २० गावांमध्ये शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. एआय तंत्रज्ञान, योग्य पाणी व्यवस्थापन आणि संतुलित खतांचा वापर यांच्या मदतीने ऊस शेतीचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here