उसाला योग्य दर, साखरेची एमएसपी वाढवावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांचे पुणे-बेंगळुरू महामार्गावर चक्काजम आंदोलन

बेळगावी (कर्नाटक) : उसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारी बेळगावी जिल्ह्यातील हिरेबागेवाडी आणि हत्तरगी येथे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून आंदोलन सुरू केले. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी विविध मागण्या मांडल्या असून, केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही सहभाग घेतला.

साखरेचा किमान आधारभूत दर (एमएसपी) 60 रुपये प्रति किलो करावा, उसाचा रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) 5,500 रुपये प्रति टन करावा, तसेच साखर कारखान्यांमधील उसाचे वजन आणि साखर उतारा निश्चित करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. याशिवाय, कर्नाटकात ऊस आणि मका यांपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी वाढवावी, तसेच घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांसाठी साखरेचे वेगवेगळे दर निश्चित करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

सार्वजनिक, सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांना भागधारकाचा दर्जा देणे बंधनकारक करणारा कायदा करावा, अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे. साखर, मळी, इथेनॉल, सहनिर्मित वीज, ऑक्सिजन, जैविक खत, प्रेसमड आणि इतर उपपदार्थांच्या विक्रीतून मिळणारा नफा शेतकऱ्यांसोबत वाटून घ्यावा, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.सरकारच्या देखरेखीखाली संगणकीकृत वजनकाटे बसवावेत आणि त्यांची नियमित तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यासाठी ऊसतोडणी आणि वाहतुकीचे वेळापत्रक तयार करून जिल्हा प्रशासनामार्फत त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आंदोलनादरम्यान महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. सर्व अवजड वाहने रोखण्यात आली, तर आपत्कालीन परिस्थिती असल्याचे सांगणाऱ्या दुचाकी आणि कारना सर्व्हिस रोडवरून जाण्याची परवानगी देण्यात आली.महामार्गालगत शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी तंबू उभारला आहे. दूरच्या भागांतून आलेले शेतकरी या ठिकाणी एकत्र येत आहेत. आंदोलकांसाठी तंबूमध्ये पाणी, चहा आणि भाजी-भाकरीची व्यवस्था करण्यात आली आहे. टोल प्लाझावर बैलगाड्या आणि ट्रॅक्टर उभे करण्यात आले आहेत. हिरेबागेवाडी आणि हत्तरगी येथील टोल प्लाझावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here