पश्चिम महाराष्ट्रात ऊसदर आंदोलन तीव्र; ठिकठिकाणी रास्ता रोको, ऊस वाहतूक रोखली

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात ऊसदराच्या मागणीवरून शेतकरी आंदोलनाने तीव्र स्वरूप धारण केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत विविध ठिकाणी रास्ता रोको आणि ऊस वाहतूक रोखण्याची आंदोलने करण्यात आली. उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलकांनी महामार्गांवर ठिय्या देत साखर कारखानदारांचे लक्ष वेधले.

पुणे-सोलापूर महामार्गावर तीन तास रास्ता रोको

ChiniMandi WhatsApp Channel

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तीन तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या दोन ते अडीच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.चालू गळीत हंगामात उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, यासाठी साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये निश्चित करण्याची मागणी आंदोलकांनी केली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत उसाला योग्य मोबदला मिळावा, अशी त्यांची भूमिका आहे.साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर केल्याशिवाय कोणताही साखर कारखाना सुरू करू देणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला.

सीमा भागात महामार्ग रोखले

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह कर्नाटकातील विविध शेतकरी संघटनांनीही महामार्गांवर चक्का जाम आंदोलन केले. सांगली आणि सातारा जिल्ह्यांत आंदोलन झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातून बेळगाव आणि हत्तरगीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी येथे आंदोलन करण्यात आले. तसेच कर्नाटकातील शेतकरी नेते चुनाप्पा पुजारी आणि प्रकाश नायक यांच्या नेतृत्वाखाली बेळगावमधील हिरेबागेवाडी आणि हत्तरगी टोलनाक्यांवर महामार्ग रोखण्यात आले.

सांगलीत १५० हून अधिक ट्रॅक्टर रोखले

सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि कडेगाव तालुक्यांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतुकीविरोधात आंदोलन केले. उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळाल्याशिवाय ऊस वाहतूक करणारी वाहने सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. या आंदोलनादरम्यान १५० हून अधिक ट्रॅक्टर रोखण्यात आल्याची माहिती आहे.सोमवारपासूनच कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखण्यास सुरुवात केली होती. बहे, येवलेवाडी, कासेगाव आणि नेर्ले परिसरात कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या ५० हून अधिक टायरची हवा सोडण्यात आल्याचे वृत्त आहे. बहे पुलावर उसाने भरलेले ४० ते ५० ट्रॅक्टर रोखण्यात आले, तर सहा ते आठ बैलगाड्यांच्या चाकांतीलही हवा सोडण्यात आली.

साताऱ्यात इंदोली फाट्यावर ऊस वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न

सातारा जिल्ह्यातील इंदोली फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावरील पुलाखाली आंदोलन केले. जयवंत शुगर कारखान्याकडे ऊस घेऊन जाणारे ट्रॅक्टर अडवून त्यांच्या टायरमधील हवा सोडण्यात आली. काही ठिकाणी टायरमधील पाणीही सोडून ऊस वाहतूक रोखण्यात आली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर मिळावा आणि ऊसदराचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

ऊसदर जाहीर करण्यासाठी कारखानदारांवर दबाव

उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या मागणीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. ऊस वाहतूक रोखणे, रास्ता रोको आणि महामार्गांवर चक्का जाम यांसारख्या आंदोलनांमुळे पश्चिम महाराष्ट्रातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. साखर कारखानदारांनी दर जाहीर करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्यावा, अशी मागणी संघटनेने पुन्हा एकदा केली आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here