बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी हत्तरगी टोल नाक्यावर महामार्ग बंद करून मोठे आंदोलन व धरणे करण्याचे नियोजन असल्याची माहिती पोलिस विभागाने प्रशासनाला दिली होती. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक, आंतरराज्य प्रवास व माल वाहतूक आणि अत्यावश्यक सेवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवर धरणे, निदर्शने, मोर्चे, रास्ता रोको तसेच सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतींना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी मोहम्मद रोशन यांनी ३० ऑक्टोबरला हा आदेश जारी केला असून, पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे, असे कळविले आहे. तसेच आंदोलनांदरम्यान, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलिस वाहने, वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत अडथळा आणता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाला योग्य आणि रास्तभाव मिळावा, या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांकडून सुरू असलेल्या आंदोलनांचा परिणाम दैनंदिन वाहतुकीवर होत आहे. पुणे ते बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ हा महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा महत्त्वाचा आंतरराज्य मार्ग आहे. या मार्गावर हिरेबागेवाडी, हत्तरगी आणि कोगनोळी यांसह विविध टोल नाके आहेत. बंकापूर, हिरेबागेवाडी, हत्तरगी आणि कोगनोळी या चार टोल नाक्यांवर केवळ दोन दिवसांत अंदाजे १.८० कोटी रुपये टोल उत्पन्नाचे नुकसान झाले असल्याचे महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर व्यक्ती, संघटना, समूहाला आंदोलन, धरणे, मोर्चावर निर्बंध लागू करण्यासह महामार्ग, सर्व्हिस रोड, प्रवेश-निर्गमन मार्ग, टोल परिसर वाहने समूहाने उभी अडथळ्यासह निर्बंध रस्त्यावर बसणे, झोपणे, बॅरिकेडस् वा अन्य वस्तू लावून आंदोलनास मज्जाव करण्यात आला आहे.


















