बंगळूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून, दिल्लीतील चार तासांच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल. त्यामुळे ऊस उत्पादकांनी रास्ता रोको आंदोलन करू नये, असे आवाहन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. मंगळवारी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना जोशी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आले आहे. ऊस उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, यासाठी सर्व राज्य सरकारांचे सहकार्य घेतले जाणार आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि आपण स्वतः शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत. ऊस उत्पादकांचे प्रश्न एक-दोन दिवसांत किंवा केवळ एका मंत्रालयाच्या माध्यमातून सुटणारे नाहीत. त्यासाठी विविध मंत्रालये आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय आवश्यक आहे. केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
समस्यांच्या अभ्यासासाठी संयुक्त समिती स्थापन करणार
ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत तीन ते चार तासांची बैठक झाली. या बैठकीला केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी, राज्य सरकारांचे संबंधित मंत्री आणि विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या सविस्तरपणे जाणून घेण्यात आल्या. या प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीत ऊस उत्पादक शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ तसेच केंद्र आणि राज्य सरकारांचे प्रतिनिधी सहभागी असतील. ही समिती समस्यांचा अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सुचवेल, अशी माहिती जोशी यांनी दिली.
एफआरपी, वजनातील तफावत आणि वेस्टेजच्या मुद्द्यांवर चर्चा
बैठकीत उसाच्या रास्त व किफायतशीर दराबाबत (एफआरपी), किमान आधारभूत किमतीची मागणी, उसाच्या वजनातील तफावत आणि ऊसतोडीनंतर साखर कारखान्यांकडून आकारल्या जाणाऱ्या नऊ टक्के वेस्टेजच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच व्यावसायिक वापरासाठीच्या साखरेचा स्वतंत्र दर निश्चित करण्याच्या मागणीवरही विचारविनिमय करण्यात आला.
कर्नाटकातील ऊस उत्पादकांच्या हितासाठी राज्य सल्लागार किंमत (एसएपी) लागू करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. तामिळनाडू, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये एसएपी लागू असल्याचा संदर्भ देत कर्नाटक सरकारनेही याबाबत विचार करावा, अशी सूचना करण्यात आली.याशिवाय उसातील साखरेचे प्रमाण, नऊ टक्के वेस्टेज, वजनातील तफावत आणि साखर कारखान्यांकडून होणाऱ्या संभाव्य गैरप्रकारांबाबतही चर्चा झाली. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची सूचना राज्य सरकारला देण्यात आल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.
दिल्लीतील बैठक निष्फळ ठरल्याचा दावा फेटाळला
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकरी नेत्यांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्याचा दावा प्रल्हाद जोशी यांनी फेटाळून लावला. ही बैठक सकारात्मक आणि फलदायी झाली असून, संयुक्त समिती स्थापन करण्याच्या निर्णयाला शेतकरी नेते राजू शेट्टी यांनीही सहमती दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.बैठकीत विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या सूचना आणि मागण्यांचाही विचार केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये तसेच निराश होऊ नये. केंद्र सरकार त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक पावले उचलेल, असे आवाहन जोशी यांनी केले.
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी ऊसदरावर चर्चा
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. या बैठकीत ऊस उत्पादकांच्या समस्या आणि २०२६-२७ च्या साखर हंगामातील ऊसदरावर चर्चा करण्यात आली.साखर कारखान्यांकडून उसाचे वजन कमी दाखविणे, वजनकाट्यांमधील कथित गैरप्रकार, ऊसतोडीनंतर वाहतुकीदरम्यान होणारी फसवणूक आणि राज्य सल्लागार किंमत निश्चित करण्यासंबंधीच्या मुद्द्यांकडे लक्ष देण्याची विनंती जोशी यांनी मुख्यमंत्री शिवकुमार यांना केली.
या भेटीची माहिती मुख्यमंत्री शिवकुमार यांनी समाजमाध्यमांवरही दिली. कर्नाटकातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य आणि लाभदायक दर मिळावा, तसेच शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या चिंता दूर व्हाव्यात, यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. राज्याची भूमिका विचारात घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.


















