नांदेड : हडसणी येथील श्री सुभाष शुगर लिमिटेड या साखर कारखान्याने १० हजार टन ऊस गाळपाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हदगाव तालुका कृषिप्रधान असून, येथील शेतकऱ्यांच्या अर्थकारणात ऊस पिकाला महत्त्वाचे स्थान आहे. ऊस वेळेत गाळप होणे, वाहतुकीची सुविधा आणि ऊस बिले वेळेवर वितरीत केली जाणे या बाबी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. उपलब्ध स्थानिक साखर कारखान्याने ऊस गाळपात गती घेतल्याने शेतकऱ्यांना बाजारपेठ होण्यासह ऊसतोड कामगार, वाहतूकदार आणि ट्रॅक्टरचालकांनाही मोठा लाभ मिळत आहे.
कारखान्याने १० हजार टन गाळपाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर हंगामातही पुढील कामकाज सुरळीत सुरू राहावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कारखान्याने विनाअडथळा ऊस गाळपावर भर दिल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, आगामी काळात गाळप प्रक्रियेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. स्थानिक कारखान्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी मिळतात. त्यामुळे कारखान्याच्या प्रगतीचा फायदा परिसरातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला होतो. गळीत हंगामाबाबत कारखाान्याचे अध्यक्ष सुभाषराव देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांचे हित हेच आमच्यासाठी सर्वोच्च स्थानी असेल. कारखान्याच्या पुढील वाटचालीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपण्याला प्राधान्य दिले जाणार आहे.


















