बेळगाव : स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत संघटनेचे कार्यकर्ते, ऊस वाहतूकदारांनी मंगळवारी ऊस व साखरेच्या दरासाठी कोगनोळी व हत्तरगी टोलनाक्यावर आंदोलन केले. सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनाचा वाहतुकीसह बससेवेवर परिणाम झाला. आंदोलनामुळे निपाणी-बेळगाव-कोल्हापूरसह राज्य आंतरराज्य मार्गावर जाणाऱ्या बसेस येथील बसस्थानकात थांबून होत्या. बेळगाव-कोल्हापूर मार्गावरील सर्व बसेस बंद ठेवल्याने या मार्गावरील प्रवासी, नोकरदारांचे हाल झाले. आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट दिसत होता. आंदोलनाचा लाभ खासगी प्रवासी वाहनधारकांनी उठविला.
ऊस दरासाठी सुरू झालेल्या आंदोलनामुळे दुपारी चार वाजण्याच्या सुमारास बेळगाव मार्गावरील काही मोजक्याच बसेस संकेश्वर, हिडकल डॅममार्गे मार्गस्थ केल्याने प्रवासी, नोकरदार व महिलांना तात्पुरता दिलासा मिळाला. सायंकाळी पाचनंतर महाराष्ट्र बसच्या फलाटावर शुकशुकाट दिसत होता. बाजारपेठेवरही या आंदोलनाचा परिणाम दिसत होता. सायंकाळी उशिरापर्यंत बससेवा बंदच होती. त्यामुळे प्रवाशांसह कामगारांची गैरसोय झाली. बसेस नसल्याने प्रवाशांची गर्दी वाढली. काही खासगी वाहने प्रवाशांना घेऊन जात होती. आंदोलनाचा परिणाम शहरातही दिसून आला. शहरातील विविध वर्दळीच्या रस्त्यासह महामार्गावरही शुकशुकाट दिसत होता.


















