पुणे : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६५व्या गळीत हंगामाचा प्रारंभबुधवारी (ता. १४) गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची उच्चांकी कामगिरीची परंपरा कायम राखू, असा विश्वास ज्येष्ठ संचालक प्रमोद काकडे यांनी व्यक्त केला. गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी साखर कामगार संघटना आणि कामगार सोसायटीच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. माजी संचालकांचाही गौरव करण्यात आला. आगामी दोन हंगाम कारखान्यासाठी कसोटीचे ठरणार असून, काटेकोर आर्थिक नियोजन आणि कारभाराची आवश्यकता असल्याचे मत कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांनी व्यक्त केले.
संचालक राजवर्धन शिंदे म्हणाले की, चालू हंगामात सभासदांच्या उसातून सुमारे १२ लाख टन आणि गेटकेनच्या माध्यमातून अतिरिक्त ऊस उपलब्ध करून साडेतेरा ते १४ लाख टन गाळपाचे नियोजन आहे. यंदा एकरी ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. हंगाम लवकर सुरू केल्याने साखर उताऱ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. धरणांतील पाण्याची उपलब्धता लक्षात घेता हंगाम लवकर संपवावा लागू शकतो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी यंदाचा हंगाम पाणीटंचाई आणि उसाच्या कमतरतेमुळे आव्हानात्मक असल्याचे सांगितले. कामगार नेते धनंजय खोमणे यांनी प्रास्ताविक केले, कामगार सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार भोसले यांनी आभार मानले. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, अभिजित काकडे, संग्राम सोरटे, ऋषिकेश गायकवाड, रमाकांत गायकवाड, बाळासाहेब कामठे, जितेंद्र निगडे, हरिभाऊ भोंडवे, उत्तम धुमाळ आदी उपस्थित होते.


















