ऊस गाळप हंगामाला आजपासून सुरुवात; शेतकरी संघटना १५ नोव्हेंबरच्या भूमिकेवर ठाम

कोल्हापूर : राज्य सरकारने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार आज, १५ ऑक्टोबरपासून ऊस गाळप हंगाम सुरू होणार असला, तरी ऊस अद्याप पूर्णपणे परिपक्व झाला नसल्याचे सांगत शेतकरी संघटनांनी हंगाम लवकर सुरू करण्यास विरोध दर्शवला आहे. हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करावा, अशी मागणी संघटनांनी केली आहे. त्यामुळे साखर कारखानदारांसमोर पेच निर्माण झाला आहे.

राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी शासनाच्या निर्णयानुसार गाळप सुरू करण्याची तयारी केली असली, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांची तोडणी यंत्रणा अद्याप पूर्ण क्षमतेने दाखल झालेली नाही. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यात तोडणी झालेला ऊस अडवण्याचे प्रकार घडत असल्याने ऊसतोडणीच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel

राज्य आणि केंद्र सरकारने यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे धोरण जाहीर केले आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे प्रत्यक्ष गाळप सुरू होण्यास विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी संघटनांनी ऊस परिपक्व झाल्यानंतरच गाळप हंगाम सुरू करावा, अशी भूमिका घेतल्याने साखर उद्योगासमोर अडचणी वाढल्या आहेत.

दरवर्षी दिवाळीनंतर विविध भागांतून ऊसतोडणी मजूर दाखल होतात आणि त्यानंतर ऊसतोडणीच्या कामाला वेग येतो. यंदा मात्र दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साखर उद्योगाकडून हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील काही कारखान्यांनी गाळप सुरू केले असले, तरी कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे कारखान्यांकडून सावध पावले उचलली जात आहेत. त्यामुळे यंदाच्या गाळप हंगामाची प्रत्यक्ष सुरुवात कधी आणि किती वेगाने होणार, याकडे शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here